लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणणारे महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना इंडो-अमेरिकन चेंबर्स आॅफ कॉमर्समार्फत ‘आयएसीसी कोविड क्रुसेडर्स २०२०’ पुरस्काराने शुक्रवारी सन्मानित करण्यात आले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा आॅनलाइन पार पडला.इंडो-अमेरिकन चेंबर्स आॅफ कॉमर्स आणि मुंबईतील अमेरिकन दूतावास यांच्याद्वारे संयुक्तपणे हा पुरस्कार देण्यात आला. भारतातील प्रशासकीय अधिकारी संवर्गातून मुंबईचे पालिका आयुक्त चहल यांना गौरविण्यात आले. या पुरस्कार संवर्गासाठी ७६ जणांची नावे विचाराधीन होती.निकषांच्या आधारे ४१ जणांची नावे नामांकनसाठी निश्चित करण्यात आली होती. मात्र, तज्ज्ञ व्यक्तींच्या परीक्षक मंडळाने ‘एक्झेम्प्लरी वर्क डन बाय ए ब्युरोक्रॅटस्ट-इंडिया’ या संवर्गामध्ये आयुक्त चहल यांची पुरस्कारासाठी निवड केली.
या आॅनलाइन सोहळ्यात अमेरिकेचे मुंबईतील राजदूत डेव्हिड जे. रांज, इंडो-अमेरिकन चेंबर्स आॅफ कॉमर्सच्या राष्ट्रीय अध्यक्षा राज्यलक्ष्मी राव, भारतासह अमेरिकेतूनही विविध मान्यवर, तज्ज्ञ, पुरस्कार विजेते जोडले गेले होते.भारतात, तसेच अमेरिकेत कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी प्रयत्न केलेल्या विविध व्यक्ती,संस्था यांना गौरविण्यासाठी या पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले होते.देशासह मानवतेची सेवापुरस्कार स्वीकारणे ही गौरवाची बाब आहे. कोविड काळात केलेली कामगिरी ही देशाची सेवा तर आहेच, सोबत मानवतेचीही सेवा आहे. या पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल ‘इंडो-अमेरिकन चेंबर्स आॅफ कॉमर्स’, तसेच परीक्षकांचा मी आभारी आहे.- इकबाल सिंह चहल, मुंबई महापालिका आयुक्त...म्हणूनच आयुक्तांची पुरस्कारासाठी निवड1 कोरोनाला पळवून लावण्यासाठी ‘चेस द व्हायरस’ ही आयुक्त चहल यांची मोहीम प्रभावी ठरली. टेस्टिंग, ट्रेसिंग, ट्रॅकिंग, ट्रीटमेंट आणि क्वारंटाइन ही पंचसूत्री अवलंबून प्रत्यक्ष काम करण्यात आले.2मुंबईतील सर्व आरोग्य यंत्रणा, डॉक्टर्स, लोकप्रतिनिधी, खासगी दवाखाने व नर्सिंग होम, स्वयंसेवी संस्था या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून मुंबईतील कोरोना संसर्गाची स्थिती नियंत्रणात आणली.3मुंबईत झालेल्या कामगिरीचे केंद्र सरकारसह जागतिक आरोग्य संघटनेनेही कौतुक केले. धारावीसारख्या झोपडपट्टीबहुल भागात अथक परिश्रम करून कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी केलेले प्रयत्न इतर देशांनीही ‘धारावी मॉडेल’ म्हणून स्वीकारले.