विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी कोविड विमा कवच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:07 AM2021-05-26T04:07:01+5:302021-05-26T04:07:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाची दुसरी लाट ही तरुणाईसाठी घातक ठरल्याची निरीक्षणे नोंदवली गेली आहेत. यापुढेही कोरोनाचा प्रादुर्भाव ...

Covid insurance cover for university students! | विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी कोविड विमा कवच !

विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी कोविड विमा कवच !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाची दुसरी लाट ही तरुणाईसाठी घातक ठरल्याची निरीक्षणे नोंदवली गेली आहेत. यापुढेही कोरोनाचा प्रादुर्भाव कसा असेल आणि कोणासाठी किती घातक ठरेल याची शाश्वती नाही. मात्र नवीन शैक्षणिक वर्षाच्या दृष्टीने किमान राज्यातील विद्यार्थी आणि त्यांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी राज्यातील विद्यापीठात शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना संबंधित विद्यापीठाच्या कुलगुरुंनी विद्यापीठ आपत्कालीन निधीमधून काही ठरावीक रक्कम कोविड उपचारासाठी कोविड विमा कवच म्हणून उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सदस्यांनी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे. यामुळे विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या होतकरू मात्र गरीब व गरजू विद्यार्थ्यांना या उपचारादरम्यान मोठी मदत होऊ शकेल, अशी प्रतिक्रिया सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी व्यक्त केली. उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी या विद्यार्थीहिताच्या निर्णयाला तात्काळ हिरवा कंदील देत यासाठी आवश्यक समिती गठित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

राज्यात कुठे आपत्कालीन परिस्थिती उद‌्भवली तर त्याचा सामना करण्यासाठी प्रत्येक विद्यापीठातील काही विद्यार्थी सरकारी यंत्रणांना मदत करण्यासाठी सक्षम असावेत यासाठी विद्यापीठांत विद्यार्थ्यांकडून काही अल्पस्वरूपातील रक्कमही आपत्कालीन निधी म्हणून गोळा केली जाते. हा निधी गोळा करून विद्यापीठांनी स्वतंत्रपणे मुदत ठेवीत ठेवणे अपेक्षित असते. सध्याच्या कोरोना प्रादुर्भावाच्या काळात अनेक विद्यार्थ्यांवर कोविडचा आघात झाला असून, आता त्याच्या उपचारासाठी त्यांच्याकडे आवश्यक आर्थिक परिस्थिती नसल्याने अनेकांना शिक्षण अर्ध्यावर सोडून काम शोधण्याची वेळ आली आहे. शिक्षण घेत असलेल्या होतकरू विद्यार्थ्यांना कोविड विमा कवच उपलब्ध झाल्यास त्यांची बरीचशी मदत त्यांना उपचारात उपयोगी येऊ शकते शिवाय ते शिक्षण प्रवाहातही कायम राहू शकतात, असे मत सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी व्यक्त केले. राज्यातील प्रत्येक विद्यापीठात विद्यार्थ्यांसाठी या उपक्रमाची सुरुवात केल्यास लाखो विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळू शकेल, अशा प्रतिक्रिया इतर सिनेट सदस्यांकडूनही मांडण्यात आल्या आहेत. दरम्यान, मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना कोविड व इतर आजारांवर अनुसरून चांगली विमा योजना चालू करण्यासाठी समिती गठित करण्याच्या सूचना उदय सामंत यांनी दिल्या आहेत. या संकल्पाची अंमलबजावणी लवकर करण्याचे आश्वासन त्यांनी युवासेना सिनेट सदस्यांना दिले.

त्या महाविद्यालयांनाही दिलासा

तौक्ते चक्रीवादळात विशेषतः कोकण सागरी किनाऱ्यावरील जिल्ह्यांना तडाखा बसून नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्तामध्ये तेथील महाविद्यालयांचेही भरपूर नुकसान झाले आहे. या नुकसानीमध्ये छप्पर उडाले असून, खिडक्या-दारे. आवाराचे नुकसान झाले व महाविद्यालयात वर्गांमध्ये पाणी शिरल्याने प्रयोगशाळा, संगणकप्रणाली व्यवस्था कोलमडून पडल्या आहेत. त्यामुळे मुंबई विद्यापीठाकडून या महाविद्यालयांचे पंचनामे करून आवश्यक ती आर्थिक मदत केली जावी, असे निवेदन उच्च व तंत्रशिक्षण सिनेट सदस्यांनी केले होते. या पार्श्वभूमीवर कुलगुरु डॉ. सुहास पेडणेकर यांच्याशी चर्चा केल्यावर त्यांनी उच्च व तंत्रशिक्षणमंत्र्यांना सकारात्मक भूमिका घेऊन मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

Web Title: Covid insurance cover for university students!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.