लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोविन डॅशबोर्डनुसार लसीकरण झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या उपलब्ध माहितीनुसार ५२ टक्के स्त्री आरोग्य कर्मचारी व ४८ टक्के पुरुष आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या माहितीवरून महिलांचा लसीकरणास चांगला प्रतिसाद आहे, असा दावा मुंबई महापालिकेने केला आहे.
महापालिकेने पहिल्या व दुसऱ्या टप्प्यासाठी २३ लसीकरण केंद्रांमध्ये १२५ बूथ कार्यान्वित केलेली आहेत. १३ जानेवारी रोजी लस महाराष्ट्र सरकारकडून पालिकेला प्राप्त झाली. आतापर्यंत ५ लाख ३२ हजार १०० एवढ्या लसीकरण मात्रा प्राप्त झाल्या. १६ जानेवारी रोजी लसीकरणाचा शुभारंभ झाला. पहिला टप्पा आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी कार्यान्वित करण्यात आला. या टप्प्यात ९ अद्ययावत लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आली. १६ जानेवारी रोजी पहिल्या दिवशी १ हजार ९५७ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले.
५ फेब्रुवारी रोजी लसीकरणाचा दुसरा टप्पा कोविड आघाडीवर काम करण्याऱ्या इतर कर्मचाऱ्यांसाठी कार्यान्वित करण्यात आला. दरम्यान, लाभार्थ्यांच्या संख्या व सुलभतेसाठी १४ अतिरिक्त लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आली. या केंद्रांची क्षमता दरदिवशी १२ हजार ५०० लाभार्थ्यांना लसीकरण करण्याइतपत वाढविण्यात आली. ६ फेब्रुवारी रोजी पोलीस दलासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली.
---------------
सद्य:स्थितीत डिजिटल मंचामार्फत दिलेल्या निमंत्रण संदेशाची वाट न पाहता नोंदणीकृत लाभार्थी उत्साहाने अगोदरच लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण करत आहेत.
---------------
लसीकरण सुरू झाल्यापासून १२ फेब्रुवारीपर्यंत मुंबईत १ लाख ७ हजार ७२५ पेक्षा अधिक लाभार्थ्यांचा लसीकरण टप्पा पार केला असून, यात ८७ हजार ४१६ आरोग्य कर्मचारी व २० हजार ३०९ आघाडीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
---------------
लसीकरण करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे वर्गीकरण
वैद्यकीय अधिकारी- ११,६७९
परिचारिका व पर्यवेक्षक- ५,६१४
इतर वैद्यकीय कर्मचारी- ५,३१६
शास्त्रज्ञ- १९२
वैद्यकीय विद्यार्थी- १,२६१
क्षेत्रीय वैद्यकीय कर्मचारी- १,८९६
प्रशासकीय कर्मचारी- ३,३५५
इतर आरोग्य कर्मचारी- ९,२७०
इतर- ३८,५८३