Join us

मुंबईकर बेफिकीर! गेल्या २४ तासांत १३,५९२ विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई, २७ लाखांचा दंड वसूल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 8:38 PM

दंड, पोलिसांचा दंडुका आणि जीवाची भीती घालूनही काही मुंबईकरांना अद्याप शहाणपण सुचलेले नाही.

कोरोना रुग्ण संख्येत अशीच वाढ होत राहिल्यास लॉकडाऊन करण्याची वेळ येईल, अशी चेतावनी महापालिका प्रशासन वारंवार देत आहे. मात्र दंड, पोलिसांचा दंडुका आणि जीवाची भीती घालूनही काही मुंबईकरांना अद्याप शहाणपण सुचलेले नाही. सार्वजनिक ठिकाणी तोंडाला मास्क न लावता आपल्या बरोबरच अन्य लोकांचे जीवही धोक्यात घालणाऱ्या तब्बल १३ हजार ५९२ बेफिकीर लोकांवर गेल्या २४ तासांमध्ये कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून पालिकेच्या पथकाने २७ लाख १८ हजार ४०० रुपये दंड वसूल केला.

लोकल सेवा ठरविक वेळेत सर्वांसाठी सुरू केल्यानंतर रेल्वे स्थानक. व गाड्यांमध्ये गर्दी वाढली. परिणामी, बाधित रुग्णांची दररोजची संख्या एक हजारांपर्यंत पोहोचली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लोकांनी तोंडाला मास्क लावणे अनिवार्य आहे. बहुतांशी लोकं मास्क चुकीच्या पद्धतीने अथवा लावतच नसल्याने दिसून येत आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क नाही तर प्रवेश नाही, असा नियम करण्यात आला आहे. मात्र बाजारपेठ, रिक्षा, टॅक्सी, विशेषतः रेल्वेमध्ये प्रवास करताना प्रवाशी मास्क काढून ठेवत आहेत. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढला आहे.

मार्शल, शिक्षक, पोलिसांचे चौफेर लक्ष...बेफिकीर लोकांना पकडून त्यांना मास्क लावण्याचे आठवण करून देण्यासाठी महापालिकेने मार्शलसह शिक्षक आणि पोलिसांनाही दंड ठोठावण्याचा अधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसार ४८ हजार मार्शल सार्वजनिक ठिकाणी, रेल्वे स्थानक व गाड्या चौफेर लक्ष ठेवून आहेत. तोंडावरचे मास्क हनुवटीवरही आणणार्‍या लोकांवर कारवाई केली जात आहे.

दररोज कारवाईचे लक्ष्य: २५ हजारमार्शल नियुक्त: ४८ हजारपश्चिम, मध्‍य आणि हार्बर उपनगरीय रेल्‍वे - प्रत्‍येकी शंभर मार्शल्‍स 

>> एप्रिल २०२०पासून आतापर्यंत १५ लाख ५८ हजार ८७ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून तब्बल ३१ कोटी ५२ लाख २५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. 

>> शुक्रवारी दिवसभरात १३५९२ लोकांकडून प्रत्येकी दोनशे या प्रमाणे २७ लाख १८ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्यामुंबई