Corona Vaccination: व्यापक लसीकरण मोहिमेमुळे मुंबईत कोविडची साथ पूर्णपणे नियंत्रणात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 09:05 AM2021-10-18T09:05:07+5:302021-10-18T09:05:34+5:30

महापालिकेचा दावा; जनुकीय सूत्र निर्धारण अंतर्गत तिसऱ्या चाचणीचे निष्कर्ष जाहीर

covid outbreak under control in Mumbai due to extensive vaccination campaign | Corona Vaccination: व्यापक लसीकरण मोहिमेमुळे मुंबईत कोविडची साथ पूर्णपणे नियंत्रणात

Corona Vaccination: व्यापक लसीकरण मोहिमेमुळे मुंबईत कोविडची साथ पूर्णपणे नियंत्रणात

Next

मुंबई : महापालिकेने ‘जिनोम सिक्वेसिंग’च्या चाचणीच्या निष्कर्षातून मुंबईतील साथ पूर्णपणे नियंत्रणात आली असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. मुंबईत मोठ्या प्रमाणात राबवण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेचा हा सकारात्मक परिणाम असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.

महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात कार्यान्वित असलेल्या कोविडच्या जनुकीय सूत्राचे निर्धारण (नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग) करणाऱ्या वैद्यकीय यंत्रणेने दोन तुकड्यांच्या चाचण्या केल्यानंतर आता तिसऱ्या तुकडीतील चाचणीचे निष्कर्ष जाहीर केले आहेत. 

लहान मुलांना बाधा होण्याचे प्रमाण नियंत्रणात
वर्षे १८ पेक्षा कमी असलेला वयोगट विचारात घेतला, तर एकूण ३४३ रुग्णांपैकी २९ जण (८ टक्के) या वयोगटात मोडतात. यापैकी ११ जणांना डेल्टा व्हेरिएंट, १५ जणांना डेल्टा डेरिव्हेटिव्ह आणि ३ जणांना इतर प्रकाराची कोविड लागण झाल्याचे आढळले. याचाच अर्थ, तुलनेने बालक व लहान मुलांना कोविडची बाधा होण्याचे प्रमाण संपूर्णपणे नियंत्रणात आहे, असे महापालिकेले सांगितले.

चाचणीमध्ये समाविष्ट 
कस्तुरबा रुग्णालयात कोविडच्या ३४३ रुग्णांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली.
नमुने घेतलेल्या ३४३ रुग्णांपैकी ४५ रुग्ण (१३%) रुग्ण हे ० ते २० वर्षे आतील वयोगटातील आहेत.
२१ ते ४० वर्षे वयोगटात १२६ रुग्ण (३७%)
४१ ते ६० वर्षे वयोगटात ९८ रुग्ण (२९%)
६१ ते ८० वयोगटात ६३ रुग्ण (१८%)
८१ ते १०० वयोगटातील ११ रुग्ण (३%)

तिसऱ्या तुकडीमध्ये एकूण ३४३ रुग्णांमधील विषाणू नमुन्यांचा अभ्यास केला असून, यात डेल्टा व्हेरिएंटचे ५४ टक्के, डेल्टा डेरिव्हेटिव्हचे ३४ टक्के, तर इतर प्रकारांचे १२ टक्के रुग्ण आढळले आहेत. परिणामी, लसीकरणाचा प्रभाव म्हणून कोविड साथ पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे या निष्कर्षांवरून आढळत आहे, असा दावा पालिकेने केला आहे.

चाचणीतील निष्कर्ष
पहिला डोस घेतलेल्या ५४ नागरिकांना कोविड बाधा झाली तरी फक्त ७ जणांनाच रुग्णालयात दाखल करावे लागले. यात ५४ पैकी एकाही नागरिकाला प्राणवायू पुरवठा, अतिदक्षता उपचार यांची गरज भासली नाही, तसेच यातील कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झाला नाही, तर दोन्ही डोस घेतलेल्या १६८ नागरिकांना कोविडची बाधा झाली. त्यापैकी फक्त ४६ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यातही अवघ्या ७ जणांना अतिदक्षता उपचारांची गरज भासली. मात्र, कोणाचाही मृत्यू ओढवला नाही.
याउलट, लसीचा एकही डोस न घेतलेल्या १२१ नागरिकांना बाधा झाली. त्यातील ५७ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. एका रुग्णास प्राणवायू पुरवठा, एकास अतिदक्षता उपचार पुरवावे लागले, तर तीन जणांचा मृत्यू ओढवला आहे. मृत्यू ओढवलेले तिघेही रुग्ण वयोवृद्ध, तसेच मधुमेह व अति उच्च रक्तदाबग्रस्त होते. यातील दोघांना डेल्टा डेरिव्हेटिव्ह, तर एकास डेल्टा व्हेरिएंटची लागण होती. या तिन्ही रुग्णांनी कोविडची बाधा निष्पन्न होऊनही रुग्णालयात दाखल होण्यास विलंब केल्याने त्यांच्या जिवावर बेतले.

Web Title: covid outbreak under control in Mumbai due to extensive vaccination campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.