विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कोविड प्रमोटेड शिक्का मारणे ही विकृतीच, सामनामधून घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 08:07 AM2020-07-16T08:07:25+5:302020-07-16T09:26:59+5:30
विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांवर कोविड प्रमोटेड असा शिक्का मारणाऱ्या विद्यापीठांवर आज सामनामधील अग्रलेखातून टीकेचे आसूड ओढण्यात आले आहेत.
मुंबई - कोरोना विषाणूच्या फैलावामुळे मार्च महिन्यापासून शैक्षणिक क्षेत्र थांबलेले आहे. त्यामुळे विविध शिक्षण विभागांच्या परीक्षा होऊ शकलेल्या नाहीत. अशा परिस्थितीत काही कृषी विद्यापीठांनी विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांवर कोविड प्रमोटेड असा शिक्का मारल्याने शिक्षणक्षेत्रात खळबळ उडाली होती. त्यानंतर कृषिमंत्री दादा भुसे यांनी खडसावल्यावर हा निर्णय गुंडाळण्यात आला होता. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांवर कोविड प्रमोटेड असा शिक्का मारणाऱ्या विद्यापीठांवर आज सामनामधील अग्रलेखातून टीकेचे आसूड ओढण्यात आले आहेत.
सामनामधील अग्रलेखात म्हटले आहे की, कोरोनाच्या आजारामुळे सध्या सर्वच क्षेत्रांमध्ये अस्थिरता निर्माण झालेली आहे. माणसाचे मनदेखील कोरोनाच्या भयाने आणि या रोगामुळे उत्पन्न झालेल्या अनिश्चिततेमुळे अस्थिर झाले आहे. काही क्षेत्रात ही अस्थिरता अपरिहार्य आहे. ती दूर करण्याचे प्रयत्न सरकारी पातळीवर सुरू आहेत. मात्र काही अस्थिरता या जाणीवपूर्वक निर्माण करण्यात येत आहेत की काय अशी शंका येण्यास वाव आहे. महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात अशी अस्थिरता जाणीवपूर्वक निर्माण करण्याचे उद्योग लपून राहिलेले नाहीत. त्यातच आता कृषी विद्यापीठांनी पुढील वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर प्रमोटेड कोविड असा शिक्का मारण्याची तयारी चालवली होती. मात्र कृषिमंत्र्यांच्या कडक भूमिकेमुळे कृषी विद्यापीठांनी हा निर्णय गुंडाळला आहे, सरकारने याबाबतीत कडक भूमिका घेतल्याने हा वाद निर्माण होण्यापूर्वीच बाटलीबंद झाला आहे, असे सामनातून सांगण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कोविड प्रमोटेड असा शिक्का मारण्याचा विचार ही विकृतीच म्हणावी लागेल. या सडक्या विचारांचे विषाणू विद्यापीठांच्या डोक्यात शिरले कसे? की हे विषाणू सोडणारे कुणी भलतेच आहेत? विद्यार्थी हा कुणाच्या स्वार्थी राजकारणाचे साधन होऊ नये, मग ही परीक्षा अंतिम असो वा कृषी विद्यापीठांच्या गुणपत्रिकांवर कोविड प्रमोटेड असा शिक्का मारण्याचा विचार. चांगले करता येत नसेल तर वाईट तरी करू नका, हे उपदव्याप थांबवा, असा इशारा सामनाच्या अग्रलेखातून देण्यात आला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
महिंद्रांनी सुरक्षा दलांसाठी आणले दणकट चिलखती अस्र; आता माओवादी, दहशतवाद्यांची खैर नाही