Join us

कोविडचा ताण कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 4:10 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई - कोरोनाची रुग्णसंख्या घटल्याने सुमारे ८५ टक्के कोविड खाटा रिक्त आहेत. त्यामुळे बऱ्याच रुग्णालयांनी गेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई - कोरोनाची रुग्णसंख्या घटल्याने सुमारे ८५ टक्के कोविड खाटा रिक्त आहेत. त्यामुळे बऱ्याच रुग्णालयांनी गेल्या काही आठवड्यांत नियमित बाह्यरुग्ण सेवा, नॉन कोविड रुग्ण उपचार आणि शस्त्रक्रिया अशा नियमित प्रक्रिया पुन्हा सुरू केल्या आहेत. सध्या कोविडपेक्षा नॉन कोविड रुग्ण जास्त प्रमाणात उपचारासाठी येत आहेत. त्यामुळे नॉन कोविड खाटांची मागणी जास्त आहे.

नॉन कोविड रुग्णालय असतानाची नियमित कामे पुन्हा सुरू झाली आहेत. सध्या केईएम रुग्णालयात नॉन कोविड रुग्ण उपचार घेत आहेत. कोविड रुग्णसंख्या वाढल्यास रुग्णालयातील कोविड बेड आणि वॉर्ड वाढविण्यात येतील, असे केईएमचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले. कोरोना दुसऱ्या लाटेत संसर्गाची तीव्रता अधिक असताना राज्य कोविड टास्क फोर्सने रुग्णालयांना कोविड रुग्णांसाठी लागणारा ऑक्सिजन आणि कोविड रुग्णांना लागणारी खाटांची संख्या पाहून पालिकेने नियमित शस्त्रक्रिया थांबविण्याचा सल्ला दिला होता; पण दोन -अडीच महिन्यांपूर्वी परिस्थिती सुधारू लागली असल्याचे सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी म्हणाले. परिणामी, नॉन कोविड रुग्णांच्या उपचारासाठी दाखल करून घेण्याच्या अडचणी कमी झाल्या आहेत.

केईएम आणि सायन रुग्णालयात आता नियमित ४००-५०० छोट्या मोठ्या शस्त्रक्रिया सुरू झाल्या आहेत. तर पालिकेच्या नायर रुग्णालयात २०० ते ३०० छोट्या मोठ्या शस्त्रक्रिया सुरू असल्याची माहिती पालिकेच्या मुख्य रुग्णालयाचे संचालक डॉ. रमेश भारमल यांनी दिली आहे.

सायन रुग्णालयाचा विस्तार

साठ वर्षे जुन्या आणि ६८,५१३ चौ. मीटर क्षेत्रफळ असलेल्या सायन रुग्णालयात मुंबई आणि मुंबईबाहेरील विविध आजारांनी त्रस्त रुग्ण उपचारासाठी दररोज येत असतात. या रुग्णांची वाढती संख्या पाहता पालिकेला या रुग्णालयाची क्षमता वाढवण्याची आवश्यकता भासली. त्यामुळे आता या रुग्णालयाच्या विस्ताराचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी पालिकेने मे. शशांक मेहंदळे ॲण्ड असोसिएट्सला सल्लागार म्हणून नेमले आहे. त्यांना १० कोटी २६ लाख रुपये देण्यात येणार आहेत. मेहंदळे यांच्या अंतर्गत आणखी दोन सल्लागार काम करणार असून, त्यांची जबाबदारी मे. मेहंदळे यांची असणार आहे. सदर रुग्णालय विस्ताराचे काम हे चार टप्प्यात करण्यात येणार आहे. हे काम पुढील आठ वर्षांत पूर्ण करण्यात येणार आहे.