लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कर्मचारी राज्य विमा महामंडळाने कोविड रिलिफ स्कीम सुरू केली आहे. कोविडमध्ये बळी पडलेल्या ईएसआय कायद्यात समाविष्ट असलेल्या कामगारांच्या आश्रितांना मासिक पेन्शनच्या स्वरूपात रोख लाभ देणारी ही लाभदायक योजना आहे. यामध्ये कोविडपासून बऱ्या झालेल्या परंतु कोविड संबंधित झालेल्या मृत्यूचा समावेश आहे.
योजनेंतर्गत लाभाचा संपूर्ण दर मृत आयपीच्या सरासरी वेतनाच्या ९० टक्के असेल, जो थेट त्याच्या आश्रितांच्या बँक खात्यात दिला जाईल. योजनेंतर्गत किमान लाभ दरमहा १८०० रुपये असेल. या योजनेत मृत कामगारांचा जोडीदार वर्षाकाठी १२० रुपयांच्या नाममात्र योगदानावर वैद्यकीय सेवेसाठी पात्र ठरेल. कोविडमुळे मरण पावलेला कामगार कोविडच्या निदानाच्या तारखेच्या कमीतकमी तीन महिन्यांपूर्वी ईएसआयसी ऑनलाइन पोर्टलवर नोंदणीकृत असावा. निदानाच्या तारखेला नोकरी असणे आवश्यक आहे आणि किमान ७० दिवसांचे योगदान निदानाच्या तत्पूर्वी एका वर्षात त्याला देय किंवा दिलेले असावे.
कोविड रिलिफ स्कीमने उपायांच्या यादीमध्ये भर घातली आहे. ज्यात अटल विमा व्यक्ती कल्याण योजनेसारख्या योजनांचा समावेश आहे, असे प्रणय सिन्हा, अतिरिक्त आयुक्त आणि प्रादेशिक संचालक यांनी सांगितले. या योजनेसंदर्भातील तक्रारी दूर करण्यासाठी प्रत्येक राज्यासाठी सार्वजनिक तक्रार निवारण अधिकारी नियुक्त केले आहेत. सार्वजनिक तक्रार निवारण अधिकाऱ्यांचा तपशील ईएसआयसीच्या वेबसाइटवर आहे. महाराष्ट्रात आता १५ ईएसआयसी / ईएसआयएस रुग्णालयांमधील २ हजार पेक्षा अधिक बेड्स कोविड उपचारासाठी समर्पित आहेत.
.......................................................