लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - कोविड-१९ विषाणूच्या डेल्टा प्रकाराचा वेगाने फैलाव होऊ लागला आहे. कस्तुरबा येथे केलेल्या चाचणीत १२८ रुग्ण हे ‘डेल्टा’ बाधित असल्याचे आढळून आले आहेत. त्यामुळे कोणत्याही कोविडबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यास, स्वतःमध्ये कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळल्यास तातडीने कोविड चाचणी करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. यासाठी मुंबई महानगर क्षेत्रात अडीचशे ठिकाणी विनामूल्य आरटीपीसीआर आणि अँटिजन चाचणी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
कोविड-१९ विषाणूचा डेल्टा प्रकार आतापर्यंत जगातील ११ देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर फैलावला आहे. याचा परिणाम म्हणून संभाव्य तिसरी लाट येऊ शकते, अशी भीती वैद्यकीय तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. कोविड लसीकरणामुळे संसर्गाच्या प्रसारास काहीसा आळा बसला असला तरी खबरदारी घेणे गरजेचे आहे. यासाठी महापालिकेने पुन्हा काही मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.
त्यानुसार चाचणीचे प्रमाण वाढविण्यात येणार असून अडीचशे ठिकाणी त्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. महापालिकेचे दवाखाने, प्रसूतिगृह, विभाग कार्यालये तसेच कोविड केंद्रांमध्ये विनामूल्य आरटीपीसीआर आणि अँटिजन चाचणी केली जाणार आहे. या चाचणी केंद्रांची यादी महापालिकेच्या संकेतस्थळ तसेच विभाग नियंत्रण कक्षांत उपलब्ध आहे. त्याआधारे आपल्या घरानजीकचे विनामूल्य कोविड चाचणी केंद्र आणि त्यांची वेळ, माहिती नागरिक प्राप्त करू शकतात.
यांनी घ्यावी काळजी...
फुप्फुसांचे आजार, हृदयविकार, यकृत विकार, मूत्राशयाचे आजार, मधुमेह, मेंदूविकार, रक्तदाब असे सहव्याधी असलेले ज्येष्ठ नागरिक, प्रसूतीकाळ नजीक असलेल्या गर्भवती माता, डायलिसिस रुग्ण, कर्करुग्ण इत्यादी जोखीम गटातील नागरिकांनी काळजी घ्यावी.
ही तीन सूत्रे पाळा..
मास्कचा वापर, सुरक्षित अंतर राखणे, हातांची नियमित स्वच्छता राखणे, गर्दीत जाणे टाळणे.