कोविड लसीकरण अंमलबजावणी; ५०० पथके नेमणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2020 07:26 PM2020-12-11T19:26:40+5:302020-12-11T19:26:57+5:30
Covid vaccination : सिटी टास्क फोर्सची बैठक
मुंबई : कोविड – १९ (कोरोना) संसर्गजन्य आजाराच्या प्रतिबंधासाठी लस उपलब्ध झाल्यानंतर प्रत्यक्ष लसीकरण मोहीम राबविताना बृहन्मुंबई महानगरपालिकेसह सर्व यंत्रणांनी समन्वय राखून आपापली जबाबदारी पार पाडावी. शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सर्व पूर्वतयारी वेगाने होत असून, सिटी टास्क फोर्स (मुंबई महानगर कृती दल) च्या माध्यमातून ही लसीकरण मोहीम योग्यरित्या राबविली जाईल, यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) तथा कृती दलाचे अध्यक्ष सुरेश काकाणी यांनी दिले.
कोविड – १९ प्रतिबंधासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार कोविड – १९ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने दिलेल्या निर्देशानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रासाठी कृती दल (सिटी टास्क फोर्स) गठीत करण्यात आला आहे. लसीकरणाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने पूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी टास्क फोर्सचे अध्यक्ष तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकाणी यांच्या अध्यक्षतेखाली बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आज (दिनांक ११ डिसेंबर २०२०) दुपारी कृती दलाची पहिली बैठक पार पडली.
बैठकीच्या प्रारंभी कृती दलाचे अध्यक्ष काकाणी यांनी बैठकीचा उद्देश समजावून सांगितला. शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार कोविड – १९ ची लस उपलब्ध झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी योग्य तयारीसह आणि पूर्व नियोजनाने करणे आवश्यक आहे. सिटी टास्क फोर्सप्रमाणे क्षेत्रीय स्तरावरील (विभाग कार्यालय स्तर) समिती गठीत करण्याची कार्यवाही देखील लवकर पूर्ण करावयाची आहे. मोहिमेतील सहभागी मनुष्यबळास आवश्यक ते प्रशिक्षण देण्यासाठी मुख्य प्रशिक्षकांना प्रशिक्षण दिले जात आहे. प्रत्यक्ष लसीकरण करण्यासाठी पाच जणांचे एक याप्रमाणे मुंबईत सुमारे ५०० पथके नेमली जातील. लसीकरणाच्या लाभार्थ्यास नोंदणीकृत भ्रमणध्वनी क्रमांकावर संदेश प्राप्त होईल. या सर्व कार्यवाहीसाठी व्यवस्थापन प्रणाली तयार करण्यात आली आहे. सर्वात आधी आरोग्य सेवक, त्यानंतर फ्रंटलाईन वर्कर्स, नंतर वय वर्ष ५० पेक्षा अधिक आणि इतर/सहव्याधी असलेले नागरिक या क्रमाने लसीकरण करण्याचे नियोजित आहे. सर्व यंत्रणांनी प्रत्येक टप्प्यावर नेमून दिलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. त्यासाठी सिटी टास्क फोर्सच्या माध्यमातून संपूर्ण देखरेख केली जाईल, असे ते म्हणाले.
सहाय्यक आरोग्य अधिकारी (लसीकरण) डॉ. शीला जगताप यांनी सिटी टास्क फोर्स आणि कोविड – १९ लसीकरण अंमलबजावणीबाबत सादरीकरण करुन तपशीलवार माहिती दिली. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील एस विभागात कांजूरमार्ग येथील एका इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर कोविड – १९ प्रतिबंधात्मक लस साठवणुकीची पूर्व तयारी करण्यात आली आहे. सुमारे ५ हजार चौरस फूट क्षेत्राची ही जागा प्रादेशिक लस भांडार (Regional Vaccine Store) म्हणून निर्देशित करण्यात आली आहे. शासन तसेच जागतिक आरोग्य संघटना यांनी लस वाहतूक, साठवणूक, लसीकरण केंद्रातील व्यवस्था, लसीकरणाचे प्राधान्य इत्यादी सर्व बाबींचे निर्देश ठरवून दिले आहेत. या सर्व बाबींचे काटेकोर पालन होईल, याची दक्षता सर्वांनी घेणे आवश्यक आहे. लसीकरण कार्यक्रमात सर्व सांख्यिकी माहिती संकलित करुन त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म देखील शासनाकडून तयार करण्यात आला आहे. पूर्व तयारी आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी या दोन्ही टप्प्यांमध्ये महानगरपालिकेसह सर्व सहभागी यंत्रणांना जबाबदारी नेमून देण्यात आली आहे. टास्क फोर्सची नियमित बैठक घेऊन सर्व कामकाजाचा आढावा घेतला जाईल, अशी माहिती सादरीकरणासह त्यांनी दिली.
उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) देवीदास क्षीरसागर म्हणाले की, महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून यापूर्वी विविध लसीकरण मोहीम राबविण्यात आल्या आहेत. त्याचा अनुभव गाठीशी असल्याने कोविड – १९ लसीकरण मोहीम यशस्वीपणे राबविण्याचा प्रशासनाला आत्मविश्वास आहे. प्रारंभी प्रत्यक्ष लसीकरण केंद्राचे एक मॉडेल उभारुन, त्याचा अभ्यास करुन त्याआधारे पुढील लसीकरण केंद्र उभारता येईल. तसेच मनुष्यबळासह आवश्यक ती यंत्रणा, सामुग्री उपलब्ध करुन समर्पितपणे ही मोहीम राबवू, असे क्षीरसागर यांनी नमूद केले.