मुंबईत आजपासून कोविड लस अमृत महोत्सव, ३० सप्टेंबरपर्यंत मिळणार विनामूल्य डोस
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 06:19 AM2022-07-15T06:19:28+5:302022-07-15T06:20:02+5:30
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव प्रीत्यर्थ केंद्र सरकारच्या निर्देशानुसार देशात ७५ दिवसांसाठी ‘कोविड लस अमृत महोत्सव’ राबविण्यात येणार आहे.
मुंबई : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव प्रीत्यर्थ केंद्र सरकारच्या निर्देशानुसार देशात ७५ दिवसांसाठी ‘कोविड लस अमृत महोत्सव’ राबविण्यात येणार आहे. मुंबईतही गुरुवारपासून हा कोविड लस अमृत महोत्सव सर्व शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर राबविला जाणार आहे. यात वय वर्षे १८ वरील ज्या पात्र लाभार्थ्यांनी कोविड-१९ लसीची दुसरी मात्रा घेतल्यानंतर सहा महिने अथवा २६ आठवडे पूर्ण झालेले आहेत, अशा लाभार्थ्यांना प्रतिबंधात्मक मात्रा विनामूल्य दिली जाणार आहे.
कोविड लस अमृतमहोत्सवाचा लाभ घेऊन संबंधित पात्र मुंबईकर नागरिकांनी कोविड लसीची प्रतिबंधात्मक मात्रा (प्रिकॉशन डोस) घ्यावी, असे आवाहन पालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी केले आहे. १५ जुलै ते ३० सप्टेंबर २०२२ या कालावधीपर्यंत ‘कोविड लस अमृतमहोत्सव’ उपक्रमाचे आयोजन केले आहे. या ७५ दिवसांच्या कालावधीत वय वर्षे १८ वरील सर्व पात्र लाभार्थ्यांना कोविड-१९ लसीची प्रतिबंधात्मक मात्रा (प्रिकॉशन डोस) मुंबईतील सर्व शासकीय व महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर विनामूल्य देण्यात येणार आहे. लस अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने पात्र नागरिकांना लसीकरणाचा लाभ देण्याच्या अनुषंगाने, केंद्र सरकारतर्फे यासंदर्भात कोविन प्रणालीमध्ये आवश्यक बदल करण्यात येणार आहेत.
२२९ कोविड लसीकरण केंद्र कार्यान्वित
- मुंबईत महानगरपालिका व शासकीय रुग्णालयात १०४, तर खासगी रुग्णालयात १२५ अशी एकूण २२९ कोविड-१९ लसीकरण केंद्र सध्या कार्यान्वित आहेत.
- वय वर्षे १८ वरील लाभार्थी लक्षात घेता, मुंबईत आतापर्यंत १ कोटी ०३ लाख १५ हजार ००४ लाभार्थ्यांना (११२ टक्के) पहिली मात्रा देण्यात आली आहे, तर ९३ लाख ५६ हजार ५४१ लाभार्थ्यांना (१०१ टक्के) दुसरी मात्रा देण्यात आली आहे.
१२ टक्के लाभार्थ्यांनी घेतला बुस्टर
आतापर्यंत ९ लाख ९२ हजार १७७ (१२ टक्के) एवढ्या लाभार्थ्यांनी प्रतिबंधात्मक मात्रा घेतली आहे. म्हणजेच प्रतिबंधात्मक मात्रा लसीकरणाचे प्रमाण कमी असल्यामुळे त्याची गती वाढविणे आवश्यक आहे.