अखेर केईएममध्ये ‘कोविशिल्ड’ची चाचणी; तीन व्यक्तींना आज देणार लस
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2020 06:13 AM2020-09-26T06:13:47+5:302020-09-26T06:14:12+5:30
पहिली लस दिल्यानंतर तिघांवर काही विपरित परिणाम होतात का, याचे निरीक्षण केले जाईल. त्यानंतर पुन्हा एका महिन्यानंतर त्यांना दुसऱ्यांदा लस दिली जाईल.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सात महिन्यांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर केईएम रुग्णालयात कोविशिल्ड लसीची चाचणी सुरू झाली आहे. आजपासून या लसीचा पहिला डोस तीन व्यक्तींना दिला जाण्याची शक्यता आहे. शिवाय, आतापर्यंत एकूण १३ जणांचे स्क्रिनिंग पूर्ण झाले आहे.
केईएम रुग्णालयाला मंगळवारी एथिक कमिटीने आॅक्स्फोर्ड कोविशिल्डच्या क्लिनिकल ट्रायलला मान्यता दिली. त्याच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच बुधवारपासून स्वयंसेवकांचे स्क्रीनिंग सुरू करण्यात आले. गुरुवारी तीन स्वयंसेवकांचे स्क्रीनिंग करण्यात आले. तिघेही चाचणीत योग्य ठरल्याने शिवाय त्यांची आरटीपीसीआर आणि अँटीबॉडी चाचणीही निगेटिव्ह आल्याने तिघांनाही शनिवारी या लसीचा पहिला डोस दिला जाणार असल्याची माहिती केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले.
शुक्रवारीही दहा जणांचे स्क्रीनिंग केल्याने एकूण १३ जणांचे स्क्रीनिंग पूर्ण झाले. काहींचा अहवाल येणे अद्याप बाकी आहे. पहिले दोन तास त्यांना निरीक्षणाखाली रुग्णालयात थांबवले जाईल. पहिली लस दिल्यानंतर तिघांवर काही विपरित परिणाम होतात का, याचे निरीक्षण केले जाईल. त्यानंतर पुन्हा एका महिन्यानंतर त्यांना दुसऱ्यांदा लस दिली जाईल. या लसीच्या योग्य अहवाल येण्यास काही कालावधी जाईल, असे रुग्णालयाचे डॉ. देशमुख यांनी सांगितले.