भित्रे बाबू लोकसभा निवडणुकीत पळ काढतील - प्रकाश आंबेडकर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2023 08:27 PM2023-12-24T20:27:52+5:302023-12-24T20:28:13+5:30
राष्ट्र सेवा दलातर्फे वांद्रे येथे संविधान निर्धार सभा
श्रीकांत जाधव
मुंबई : सध्या चळवळ किंवा कुटुंब अशी टोकाची स्थिती आहे. दोघांपैकी कोणाला प्राधान्य देता त्यावर चळवळीची पुढची लढाई आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत समविचारी पक्ष एकत्र येण्याचा विचार हवा. मात्र, चळवळीपेक्षा कुटुंबाला आणि तुरुंगाच्या भीतीने काही भित्रे बाबू लोकसभा निवडणुकीत पळ काढतील, अशी शक्यता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी येथे व्यक्त केली. त्यासाठी प्रसंगी स्वबळावर सर्व जागा लढाव्यात. यापुढे धर्माची सखोल चिकित्सा केल्याशिवाय चळवळीचा लढा अशक्य, असेही ते म्हणाले.
राष्ट्र सेवा दल आंदोलन शतक महोत्सवी वर्ष आणि साने गुरुजी १२५ वे जयंती वर्ष निमित्ताने वांद्रे येथील चेतना महाविद्यालयात संविधान निर्धार सभेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
१९४९ मध्ये सरदार पटेल गृहमंत्री असताना त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घातली. त्यानंतर ३ अटीवर त्याच्या प्रमुखांची सुटका केली. त्यापैकी एका अटीप्रमाणे संघाने भारताचा स्वतंत्र दिन १५ ऑगस्त रोजी साजराच केला नाही. त्यामुळे पटेल नाखूष होते. चळवळींनी धर्मवाद्यांना नेहमीच कडवा विरोध केला. मात्र, नव्या समाजाचे प्रश्नाला पर्याय दिले नाही. निर्माण झालेल्या दरीची जागा धार्मिक संघटनांनी घेतली. अनेक मंडळी धर्म वादाकडे झुकली. तेव्हा विरोधासाठी नवीन भूमिका घावी लागेल. धर्माची कठोर पण तर्कवादाने चिकित्सा केल्याशिवाय ही लढाई जिंकणे आता अशक्य नाही. ३७० कलम रद्द केल्यानंतर काश्मीरचा मुद्दा आंतराष्ट्रीय झाला. हे आक्रमकपणे मांडले पाहिजे. ज्यांच्या पाठीमागे आपण उभे राहतो. ते नेमके त्याच विचाराचे राहिलेले नाही. ज्याच्यावर विश्वास ठेवता तेच भितरे बाबू झाले आहेत. कुटुंब की चळवळ यापैकी कोणाला ते प्राध्यान्य देतात. यावर चळवळीचा पुढचा लढा आहे. मात्र सद्याची स्थिती पाहता काही मंडळी येत्या लोकसभा निवडणुकीत एकत्र येण्याएवजी घाबरून पळ काढतील असे धक्कादायक विधानही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केले.
सभेचे स्वागताध्यक्ष आमदार शिरीष चौधरी आणि प्रास्ताविक नितीन वैध यांनी केले. तसेच सहा ज्येष्ठ कार्यकर्त्याचा गौरव करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव, डॉ, गणेश देवी, आमदार कपिल पाटील, काळुराम धोदडे, पन्नालाल सुराणा, दत्ता गांधी, बानी दास, यशवंत क्षीरसागर, अब्दुल कादर मुकादम, भारत लाटकर, अशोक बेलसरे, कृष्णा खोत आदी सेवा दलाची ज्येष्ठ मंडळी उपस्थित होते.