Join us  

महाराष्ट्राच्या राज्यपालपदी सी.पी. राधाकृष्णन; हरिभाऊ बागडे राजस्थानचे राज्यपाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2024 7:35 AM

राष्ट्रपती भवनाने नवीन राज्यपालांच्या नियुक्तीचे प्रसिद्धीपत्रक शनिवारी रात्री उशिरा जारी केले.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : झारखंडचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असतील. महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे ज्येष्ठ नेते हरीभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती भवनाने नवीन राज्यपालांच्या नियुक्तीचे प्रसिद्धीपत्रक शनिवारी रात्री उशिरा जारी केले.

महाराष्ट्राच्या राज्यपालपदावर नियुक्त झालेले सी.पी.राधाकृष्णन हे आतापर्यंत झारखंडचे राज्यपाल होते आणि त्यांच्याकडे तेलंगणाच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार होता. ते मूळचे तमिळनाडूचे आहेत आणि कोईम्बतूर मतदारसंघातून भाजपतर्फे दोनवेळा लोकसभेवर निवडून गेले होते. ते तामिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्षही राहिले आहेत. आता महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून ते रमेश बैस यांची जागा घेतील.

आणखी काही राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे. सी.एच. विजयशंकर हे मेघालयचे नवे राज्यपाल असतील. राधाकृष्णन यांना झारखंडमधून महाराष्ट्रात पाठविताना झारखंडच्या राज्यपालपदी संतोषकुमार गंगवार यांची नियुक्ती करण्यात आली. रमण डेका हे छत्तीसगडचे नवे राज्यपाल असतील. जिशू देव वर्मा हे तेलंगणाचे तर ओमप्रकाश माथूर हे सिक्कीमचे नवे राज्यपाल असतील. पुद्दुचेरीच्या नायब राज्यपालपदी के. कैलासनाथन यांची नियुक्ती करण्यात आली. आसामचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया हे आता पंजाबचे नवे राज्यपाल आणि केंद्रशासित चंडीगडचे प्रशासक असतील. आतापर्यंत ही जबाबदारी बनवारीलाल पुरोहित यांच्याकडे होती.

काही दिवसांपूर्वी पुरोहित यांनी राजीनामा दिला होता. मात्र ते पदावर कायम होते. आता राष्ट्रपती भवनने त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे.

बागडे : सामान्य कार्यकर्ता ते राज्यपाल

हरीभाऊ बागडे हे महाराष्ट्रातील भाजपचे दिग्गज आणि निष्ठावंत नेते. २०१४ ते २०१९ या काळात ते महाराष्ट्र विधान- सभेचे अध्यक्ष होते. ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. १९९५ मधील युती सरकारमध्ये ते मंत्री होते. १९८५ मध्ये तत्कालिन औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. सहकार क्षेत्रात त्यांनी भरीव कार्य केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम करत असतानाच ते भाजपचे कार्य करू लागले.

 

टॅग्स :महाराष्ट्रहरिभाऊ बागडे