ब्रिटिश हेरिटेज नको, हवा स्वातंत्र्य लढा, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा इतिहास
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2018 11:44 AM2018-04-13T11:44:09+5:302018-04-13T11:45:31+5:30
मुंबई महानगरपालिकेने फोर्टचा रस्ता आणि विभागाला ब्रिटीश हेरिटेज करण्याचा घाट घातला असून, महापालिकेच्या या निर्णयाला त्याला भारतीय कम्युनिस्ट पक्षाने विरोध केला आहे.
मुंबई - मुंबई महानगरपालिकेने फोर्टचा रस्ता आणि विभागाला ब्रिटीश हेरिटेज करण्याचा घाट घातला असून, महापालिकेच्या या निर्णयाला त्याला भारतीय कम्युनिस्ट पक्षाने विरोध केला आहे. हा परिसर ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्यास तो प्रयत्न भाकप हाणू पाडेल असा इशारा देण्यात आला आहे.
याबाबत भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या मुंबई कौन्सिलचे सचिव कॉ. प्रकाश रेड्डी म्हणाले की, " ही साम्राज्यवाद धार्जिणी मनोवृत्ती आहे. ज्या ब्रिटिशांनी दहशतीने भारतीयांची लूट केली. जालियनवालाबागसारखे हत्याकांड केले, त्याविरोधात भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या क्रांतिकारकांनी हौतात्म पत्करले होते. मुंबईतही २२ फेब्रूवारी १९४६ साली नाविकांनी ऐतिहासिक बंड केले. हे बंड फोर्ट परिसरातच झाले.त्याला कम्युनिस्ट पक्षाने,विद्यार्थि संघटना एआयएसएफने पाठिंबा दिला होत. कामगारांनी संप केला. ३०० च्यावर लोक ब्रिटिशांच्या गोळीबारात ठार झाले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली कला,वाणिज्य,विज्ञान क्षेत्राची महाविद्यालये याच विभागात आहेत. हा इतिहास लोकांसमोर आणला पाहिजे. ब्रिटेशांचे पुतळे काय बसवता."
यावेळी याच परिसरात झालेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा दाखलाही प्रकाश रेड्डी यांनी दिला. "याच भागात संयुक्त महाराष्ट्र चळवळीची अनेक आंदोलने झाली. अण्णाभाऊ साठे,अमर शेख यांच्य्या पोवड्यांनी हा भाग दुमदुमला.सेनापती बापट,कॉ.डांगे, एस एम जोशी, आचार्य अत्रे यांच्या भाषणांनी हा भाग लढ्याचा परिसर झाला. त्यावेळी सरकारच्या गोळीबारात, लाठीमारात अनेक हुतात्मे शहीद झाले. लढ्याची आठवण म्हणून हुतात्मा स्मारकही येथे ऊभे आहे. आता त्याच्याऐवजी ब्रिटिशांचे पुतळे आणून बसवण्याच्या मनोवृत्तीचा निषेधच केला पाहिजे. हे पुतळे म्युझियममध्येच ठेवा. हेरिटेजच्या नावाने तो परिसर ताब्यात घेऊन तेथे मॉल करण्याचा हा प्रयत्न आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष हा प्रयत्न हाणून पाडेल."असे प्रकाश रेड्डी म्हणाले.