मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मराठवाडा दौऱ्याला सुरुवात केली आहे. धाराशिव मतदारसंघातून त्यांनी आता आपला दौरा सुरू केला असून पहिल्याच दिवशी त्यांनी नाव न घेता धाराशिवचे पालकमंत्री तानाजी सावंत यांच्यावर बोचरी टीका केली होती. त्यानंतर, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा संदेश घेऊन ते बीड आणि संभाजीनगरमध्येही पोहोचले. मात्र, धाराशिवमध्ये टीका केल्यानंतर आता पुन्हा एकदा आमदार पवार यांनी हाती खेकडा घेत अप्रत्यक्षपणे आरोग्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे.
तानाजी सावंत यांनी खेडक्यामुळे धरण फुटल्याचं विधान केलं होतं. विशेष म्हणजे या विधानाचं त्यांनी स्पष्टीकरणही दिलं होतं. तर, हाफकीन इंस्टीट्यूटबद्दलचेही त्यांचे विधान खूप गाजले होते. त्यानंतर, त्यांच्यावर टीकाही झाली होती. आपल्या धाराशिव दौऱ्यात रोहित पवार यांनी या दोन्ही विधानांचा उल्लेख करत सावंत यांच्यावर नाव न घेता टीका केली होती. आता, बीड आणि संभाजीनगर दौऱ्यादरम्यानही त्यांनी नाव न घेता तानाजी सावंत यांना लक्ष्य केलं आहे. आमदार पवार यांनी हाती खेकडा पकडलेला दिसून येते. त्यासोबत, कॅप्शन देत त्यांनी तानाजी सावंत यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला.
''आपलं अपयश झाकण्यासाठी या बिचाऱ्याला उगीचच खूप बदनाम केलं... त्यामुळं याची खूप कीव येते.. आता पुढच्या अपयशाला कुणाला बदनाम केलं जातं हे बघूया!'', अशा शब्दात आमदार पवार यांनी नाव न घेता पुन्हा एकदा तानाजी सावंत यांच्यावर टीका केली.
दरम्यान, घेऊन येतोय साहेबांचा संदेश असे म्हणत रोहित पवार यांनी मराठवाडा दौऱ्याला सुरुवात केली आहे. पहिल्यादिवशी धाराशिव आणि बीड दौरा केल्यानंतर ते लातूरमध्ये गेले होते. लातूरनंतर संभाजीनगर येथेही त्यांनी दौरा केला. या दौऱ्यात रोहित पवार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. त्यासाठी बैठकांचेही आयोजन करण्यात येत आहे. तसेच, येथील कार्यक्रमात भाषण करताना सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांवर टीकाही करताना दिसून येतात.
धाराशिवमधून बोचरी टीका
''खेकड्याला खाज खूप असते, खेकडा जेव्हा खायचा असतो तेव्हा त्याची खाज उतरावी लागते. म्हणजे ती खाज आपल्याला येत नाही, असे म्हणत रोहित पवार यांनी तानाजी सावंत यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला होता. खेकड्याची उपमा देत त्यांनी सावंत यांना खोचक टोमणेही लगावले. अधिवेशनामध्ये भाषण करत असताना, एक तर ते काय भाषण करतात हे कळत नाही. कोरोना काळात ते आरोग्यमंत्री नव्हते या गोष्टीचं समाधान आहे. ते जर कोरोना कालावधीत मंत्री असते. बाबा.. बा..बा... काय झालं असतं, असा खोचक टोलाही रोहित पवार यांनी लगावला. तर, आता खऱ्या अर्थाने हाफकीनला बोलावण्याची वेळ आलीय, असेही त्यांनी म्हटले.