Join us

अंधेरीपाठोपाठ ग्रँट रोडमधील पुलाला तडे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2018 12:29 PM

ग्रँट रोड येथील पूल वाहतुकीसाठी बंद

मुंबई: अंधेरीतील गोखले पूल दुर्घटना घडून 24 तासही उलटले नसताना ग्रँटरोडमधील पुलाला तडे गेल्याचा प्रकार समोर आला आहे. याबद्दलची माहिती मिळताच महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर या पुलावरील वाहतूक अन्य मार्गांवरुन वळवण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या या पुलाच्या तपासणीचं काम सुरू असून ते पूर्ण झाल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल. ग्रँटरोड आणि नाना चौकाला जोडणाऱ्या पुलाला तडे गेल्याचं बुधवारी सकाळी निदर्शनास आलं. त्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. या पुलावरील वाहतूक केनडी पुलावरुन वळवण्यात आली आहे. सध्या अग्निशमल दल, पालिका अधिकारी आणि वाहतूक पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलं आहे. सुरक्षेच्या दृष्टीनं हा पूल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी गोखले पादचारी पुलाचा काही भाग कोसळल्याची घटना घडली होती. पुलाचा भाग रेल्वे रुळांवर कोसळल्यानं पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीचा पूर्णपणे खोळंबा झाला होता. तब्बल सोळा तासांनी ही वाहतूक पूर्ववत झाली. अंधेरीतील पूल दुर्घटनेनंतर शहरातील पुलांच्या स्थितीचा मुद्दा चर्चेत आला. त्यातच आता ग्रँटरोडमधील पुलाला तडे गेल्यानं हा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.   

टॅग्स :मुंबईरस्ते वाहतूक