अटल सेतूच्या रॅम्पला तडे; पाच महिन्यांतच भेगा पडल्याने कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2024 05:47 AM2024-06-22T05:47:40+5:302024-06-22T05:48:18+5:30

या प्रकल्पासाठी तब्बल १८ हजार कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. हा मार्ग जानेवारीत वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

Cracks in the ramp of Atal Setu | अटल सेतूच्या रॅम्पला तडे; पाच महिन्यांतच भेगा पडल्याने कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

अटल सेतूच्या रॅम्पला तडे; पाच महिन्यांतच भेगा पडल्याने कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्क , मुंबई : पाच महिन्यांपूर्वी गाजावाजा करत सुरू करण्यात आलेल्या मुंबई ट्रान्सहार्बर लिंकला (अटल सेतू) जोडण्यासाठी नव्याने बांधण्यात आलेल्या रस्त्यांना भेगा पडल्याचा प्रकार समोर आला आहे. अल्पावधीतच या रस्त्याला भेगा पडल्याने कामाच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यातून राजकीय क्षेत्रातून आणि नागरिकांकडून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणावर (एमएमआरडीए) टीकेची झोड उठविण्यात आली आहे.  

शिवडी ते न्हावाशेवा यांना थेट जोडण्यासाठी २१.८ किमी लांबीच्या पुलाची उभारणी केली आहे. या प्रकल्पासाठी तब्बल १८ हजार कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. हा मार्ग जानेवारीत वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. अटल सेतूवर येण्यासाठी दोन्ही बाजूंना मिळून जवळपास साडेपाच किमी लांबीचे रॅम्प उभारण्यात आले आहेत. यामध्ये नवी मुंबई बाजूकडील उलवे येथून मुंबईकडे येणाऱ्या वाहनांसाठी उभारण्यात आलेल्या रॅम्पला तीन ठिकाणी  भेगा पडल्याचे समोर आले आहे. या पॅकेजचे काम स्ट्रॅबॅग या कंपनीला दिले होते. त्यांच्याकडून या पोहोचमार्गावर डांबरी रस्ता उभारण्यात आला आहे. त्यालाच मोठ्या भेगा पडल्याने एमएमआरडीएला टीकेला सामोरे जावे लागत आहे. कंत्राटदाराने या रॅम्पचा भराव योग्य प्रकारे न घातल्याने भेगा पडल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. 

एमएमआरडीएचे म्हणणे...
प्रकल्पाच्या ऑपरेशन आणि मेंटेनन्स टीमने २० जूनला केलेल्या तपासणीदरम्यान उलवेकडून मुंबईच्या दिशेला जाणाऱ्या रॅम्प क्रमांक ५ अस्फाल्टवर तीन ठिकाणी किरकोळ भेगा निदर्शनास आल्या आहेत. त्या त्वरित दुरुस्त करण्यासारख्या आहेत. कंत्राटदाराने त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू केले असून सेतूवरील वाहतुकीला कोणताही अडथळा न होऊ देता २४ तासांत हे काम पूर्ण केले जाणार आहे, असे एमएमआरडीएकडून सांगितले जात आहे. 

 सेतूचे काम निकृष्ट : पटोले 
- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ज्या अटल सेतूचे उद्घाटन झाले. त्या रस्त्याला तीन महिन्यातच भेगा पडल्या. नवी मुंबईकडील एका भागात अर्धा किलोमीटरपर्यंत रस्ता खाली खचला. महायुती सरकारने भ्रष्टाचाराच्या सीमा ओलांडल्या. 
- कर्नाटकातील आधीचे भाजप सरकार ४० टक्के कमिशनवाले होते, पण महायुती सरकार १०० टक्के कमिशनखोर आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. 
- पटोले यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींबरोबर अटल सेतूची पाहणी करून रस्त्याला भेगा पडल्याचे निदर्शनास आणून दिले. शिवडी न्हावा शेवा प्रकल्पावर राज्य सरकारने १८ हजार कोटी खर्च केला असून यासाठी बँकेकडून कर्ज काढले आहे. हा भ्रष्टाचार असल्याचे ते म्हणाले.

समुद्रातील पुलाला तडा नाही
अटल सेतू पुलाच्या मुख्य भागावर कोणतेही तडे गेले नसून विविध माध्यमांतून त्याबाबत अफवा पसरवल्या जात आहेत. अफवांवर विश्वास ठेवू नका. अटल सेतूला जोडणाऱ्या पोहोचमार्गावर किरकोळ भेगा आढळून आल्या आहेत. पोहोचमार्ग मुख्य पुलाचा भाग नसून तो पुलाला जोडणारा सेवा रस्ता आहे. तसेच या भेगा या प्रकल्पातील संरचनात्मक दोषांमुळे नाहीत. त्यामुळे पुलाच्या संरचनेला कोणताही धोका नाही, असेही एमएमआरडीएकडून सांगण्यात आले आहे. 

Web Title: Cracks in the ramp of Atal Setu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.