नव्याने काँक्रिटीकरण झालेल्या अंधेरी-कुर्ला रस्त्याला गेले तडे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 03:29 AM2020-01-19T03:29:33+5:302020-01-19T03:29:46+5:30

अंधेरी-कुर्ला रस्ता हा मुंबईतील अत्यंत महत्त्वाचा व व्यस्त रस्त्यांपैकी एक आहे. तसेच पूर्व व पश्चिम उपनगरांना जोडणारा रस्ता आहे.

Cracks in The newly-constructed Andheri-Kurla road | नव्याने काँक्रिटीकरण झालेल्या अंधेरी-कुर्ला रस्त्याला गेले तडे

नव्याने काँक्रिटीकरण झालेल्या अंधेरी-कुर्ला रस्त्याला गेले तडे

Next

मुंबई : अंधेरी पूर्वेकडील अंधेरी-कुर्ला रस्त्याचे नव्याने काँक्रिटीकरण केले असून, आता या रस्त्यावर जागोजागी तडे गेले आहेत. तसेच अंधेरी-कुर्ला रस्त्याच्या रखडलेल्या कामांमुळे मार्गाची दुरवस्था झाली आहे. अर्धवट कामामुळे वाहतूककोंडीही मोठ्या प्रमाणात होते आहे. रस्त्याच्या कामामध्ये निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याने रस्त्यांच्या समस्यांमध्ये भर पडत आहे. नागरिकांसह वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. मात्र, महापालिका व रस्ते विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे.

अंधेरी-कुर्ला रस्ता हा मुंबईतील अत्यंत महत्त्वाचा व व्यस्त रस्त्यांपैकी एक आहे. तसेच पूर्व व पश्चिम उपनगरांना जोडणारा रस्ता आहे. अंधेरी पूर्वेकडे अनेक महत्त्वाची महाविद्यालये, शाळा, रुग्णालये, सीप्झ, एमआयडीसी, आंतरराष्ट्रीय विमानतळ, पंचतारांकित हॉटेल्स, कार्यालये, लघुउद्योग, उद्योग वसाहती, धार्मिक स्थळे व मेट्रो रेल्वे आहेत. त्यामुळे दररोज रस्त्यावर रहदारीचे प्रमाण अधिक आहे. याशिवाय कामाच्या ठिकाणी पोहोचण्याकरिता असंख्य नागरिक दररोज याच रस्त्यावरून प्रवास करतात. या वेळी प्रवासादरम्यान वाहतूककोंडी, खड्डे या समस्यांना प्रवाशांना तोंड द्यावे लागते.

अंधेरी-कुर्ला रस्त्यावर ठिकठिकाणी तडे गेले असून ते दिवसेंदिवस वाढत आहेत. तसेच रस्त्यांची चाळण होऊन खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. काही महिन्यांपूर्वी नव्याने बांधलेल्या काँक्रिटच्या अंधेरी-कुर्ला रस्त्याला जागोजागी तडे गेले, तर काही रस्त्यांवरचे सिमेंट उखडले आहे.

काँक्रिट रस्ते बांधकामाच्या कोट्यवधींच्या कामांमध्ये भ्रष्टाचार होऊन सदर कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत; म्हणूनच अंधेरी-कुर्ला रस्त्यावर मोठ्या प्रमाणात जागोजागी तडे गेले आहेत, अशी माहिती अंधेरी पूर्व विधानसभेचे मनसे विभाग अध्यक्ष रोहन सावंत यांनी
दिली.

रस्त्याला तडे जाणे ही तांत्रिकदृष्ट्या समस्या असते. परंतु, तरीही अधिकाऱ्यांना पाठवून रस्त्याची पाहणी करायला सांगतो.
- संजय दराडे,
प्रमुख अभियंता (रस्ते)

रस्त्याचे काम करताना जे तडे जातात त्याचा फारसा काही परिणाम होत नाही. मात्र, तरीही संबंधित अधिकाऱ्यांना याबद्दल माहिती दिली होती. त्यांचेही म्हणणे तेच आहे की, रस्त्यावरील तड्यांची दुरुस्ती होऊ शकते. २००६-०७ साली एमएमआरडीएने कोकिळाबेन रुग्णालयाजवळील रस्ता दुरुस्त केला होता. या रस्त्यालाही तडे गेले होते, पण त्यात डांबर टाकून ते भरण्यात आले. अजूनही तो रस्ता चांगला आहे.
- एस. जे. बनसोडे,
उपप्रमुख अभियंता (पश्चिम उपनगर, रस्ते)

Web Title: Cracks in The newly-constructed Andheri-Kurla road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.