प्रतीक्षा नगरात म्हाडा इमारतींना तडे; जमिनीला भेगा, हजारो रहिवाशांचा जीव मुठीत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 12:22 PM2023-03-26T12:22:19+5:302023-03-26T12:25:02+5:30

दुर्घटनेची व्यक्त केली भीती

Cracks on MHADA buildings in Pratiksha Nagar | प्रतीक्षा नगरात म्हाडा इमारतींना तडे; जमिनीला भेगा, हजारो रहिवाशांचा जीव मुठीत

प्रतीक्षा नगरात म्हाडा इमारतींना तडे; जमिनीला भेगा, हजारो रहिवाशांचा जीव मुठीत

googlenewsNext

- श्रीकांत जाधव  

मुंबई : प्रतीक्षा नगर येथील संक्रमण शिबिर, गाळे आणि म्हाडा निवासी इमारतींची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. येथील काही इमारतींच्या भिंती, खांबांना मोठमोठे तडे गेले आहेत. तसेच मोठ्या भेगा पडून जमीन दबल्या गेल्या आहेत. या घटनेने रहिवासी त्रस्त झाले असून जीव मुठीत घेऊन दिवस काढत आहेत. येथे केव्हाही मोठी दुर्घटना होईल,अशी भीती रहिवाशांनी व्यक्त केली आहे. 

प्रतीक्षानगर येथे म्हाडा प्राधिकरणाचे जवळपास साडेपाच हजारांपेक्षा जास्त गाळेधारक संक्रमण शिबिरात व म्हाडाच्या इतर इमारतीत गेल्या ४६ वर्ष वास्तव करीत आहेत. १९९६ पासून ह्या संक्रमण शिबिरातील इमारतीच्या पुनर्वसनला सुरुवात झाली. मात्र सध्या संक्रमण शिबिरांची अवस्था भयावह आहे. या संक्रमण शिबिरात जवळपास १५० इमारतींना मोठे तडे गेले आहेत. इमारतीचा डोलारा ज्या सिमेंट खांबांवर उभा केला जातो त्या खांबांनाही तडे गेले आहेत. 

तसेच इमारतीच्या सभोवताली परिसराची जमीन खचत चाललेली आहे. त्यामुळे जमिनीचा काही भाग वर खाली  झालेला आहे. ही वस्तुस्थिती वारंवार म्हाडा प्रशासनातील अधिकाऱ्यांना दाखवून दिली. मात्र तात्पुरती डागडुजी करून खांबांना जॅकेटिंग करून संबंधित अधिकारी वेळ मारून नेत आहेत असे येथील माजी नगरसेवक रामदास कांबळे यांचे म्हणणे आहे. यामुळे धोका वाढल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसेना विभागप्रमुख माजी नगरसेवक मंगेश सातमकर आणि नगरसेवक रामदास कांबळे यांच्या सहीचे एकत्रित पत्र म्हाडा उपाध्यक्ष यांना २४ मार्च रोजी दिले आहे. याबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी उपाध्यक्षांच्या दालनात बैठक घेण्याची मागणी केली होती. म्हाडा अधिकारी केवळ इमारतींना भेट देतात. ठोस काही करीत नाहीत. त्यामुळे आम्हाला जीव मुठीत घेऊन दिवस काढावे लागत आहे, असे येथील लोकांचे म्हणणे आहे.

Web Title: Cracks on MHADA buildings in Pratiksha Nagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.