भिंतींना चिरा पडल्यात, दुर्घटना घडू शकते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:08 AM2021-07-14T04:08:15+5:302021-07-14T04:08:15+5:30
गोरेगाव येथील दुर्घटना : मार्चमध्येच सोसायटीने एमएमआरडीएकडे केली होती लेखी तक्रार लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ‘इमारतीच्या भिंतींना आतून-बाहेरून ...
गोरेगाव येथील दुर्घटना : मार्चमध्येच सोसायटीने एमएमआरडीएकडे केली होती लेखी तक्रार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘इमारतीच्या भिंतींना आतून-बाहेरून भेगा पडल्या आहेत. त्यामुळे त्याची दुरुस्ती करा अन्यथा दुर्घटना घडू शकते.’, पी ८ बाबत अशी लेखी तक्रार मार्च महिन्यातच गोरेगावच्या अमन को-ऑपरेटिव्ह सोसायटीने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) दिली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने आरसलान अन्सारी (८) याच्या अंगावर स्लॅबचे प्लास्टर पडून त्याचा मृत्यू झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
सोसायटीने १६ मार्च, २०२१ रोजी एमएमआरडीए प्रशासनाला दिलेले इमारत दुरुस्ती करण्याबाबतचे तक्रारपत्र ‘लोकमत’च्या हाती लागले आहे. या पत्रामध्ये सदनिकांचे बाथरूम, टॉयलेट लिकेज आहे, चिरा पडल्याने बिकट अवस्था झालेल्या टेरेसवरून पाणी सातव्या मजल्यावर झिरपते. इमारतीच्या भिंतींना आतून-बाहेरून चिरा पडल्या आहेत, ज्यातून पावसाचे पाणी आत येऊ शकते, असा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच या स्थितीत अपघात घडू शकतो ज्याला प्राधिकरण आणि संबंधित अधिकारी जबाबदार असतील याची कल्पना सोसायटीने प्राधिकरणाला दिल्याचे यातून उघड होत आहे. एमएमआरडीएचे कार्यकारी अभियंता (अभियांत्रिकी विभाग) तसेच आयुक्त यांना ही तक्रार देण्यात आली असून यात सोसायटी अध्यक्ष मेवालाल गुप्ता आणि सचिव कासम शेख यांची सही आहे. त्यानुसार या प्रकरणी दुर्लक्ष करत लहान मुलाच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करून अन्सारी कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशीही मागणी स्थानिकांकडून करण्यात आली आहे.
अद्याप गोरेगाव येथील दुर्घटनेप्रकरणी पोलिसांकडून कोणालाही अटक अथवा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. याबाबत नातेवाइकांनी खंत व्यक्त केली आहे.