Join us  

परीक्षांच्या काळात प्रशिक्षणाचा खटाटोप; शाळांचे नियोजन बिघडणार, शिक्षक संघटनांचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2024 8:37 AM

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून (एससीईआरटी) राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (एनईपी) अनुषंगाने राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांच्या क्षमता वृद्धीसाठी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येणार आहे.

मुंबई : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून (एससीईआरटी) राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (एनईपी) अनुषंगाने राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांच्या क्षमता वृद्धीसाठी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येणार आहे. मात्र, आधीच शिक्षकांना लावण्यात आलेल्या विविध अशैक्षणिक कामांमुळे शाळांचे नियोजन बिघडले आहे. त्यातच ऐन दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या कालावधीत मुंबईतील चार हजार शिक्षकांना नव्याने प्रशिक्षणासाठी जावे लागणार असल्याने शाळांचे नियोजन बिघडणार आहे. त्यामुळे शिक्षकांनी प्रशिक्षण स्थगित करण्याची मागणी केली जात आहे.

एससीईआरटीकडून खोपोली येथे प्रशिक्षण घेतलेल्या तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून पुढील आठवड्यापासून १०० टक्के शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण करण्याचे निर्देश एससीईआरटीने दिले आहेत.

३१ मार्चपासून दहावीची परीक्षा सुरु होत आहे. या परीक्षांच्या कामकाजात शिक्षक व्यस्त आहेत. त्यातच आठवी, नववी तसेच अकरावीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रमही पूर्ण करून परीक्षांचे नियोजन शिक्षकांना करावे लागणार आहे. मात्र, आधीच विविध अशैक्षणिक कामांमुळे विद्याथ्यांचे वर्ग बुडाले आहेत. त्यामुळे यात पुन्हा प्रशिक्षणाचा घाट घातल्यास शाळांचे नियोजन बिघडणार आहे.

'सद्य:स्थितीत बोर्डाच्या * प्रात्यक्षिक परीक्षांचे काम सुरू आहे. यातील बारावीच्या तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण ५ मार्चपर्यंत, तर दहावीच्या परीक्षांचे गुण १५ मार्चपर्यंत बोर्डाकडे सादर करायचे आहेत.

अन्य शिक्षकांवर * अतिरिक्त कामांचा ताण येणार आहे. त्यातून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल, अशी प्रतिक्रिया एका शिक्षकाने दिली, तर हे प्रशिक्षण एप्रिल महिन्यात सर्व परीक्षा संपन्न झाल्यावर घ्यावे, अशीही सूचना त्यांनी केली.

मुंबईतील सर्व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरील चार हजार शिक्षकांचे प्रशिक्षण ऐन परीक्षांच्या कालावधीत ठेवल्याने शाळांचे नियोजन बिघडणार आहे. शिक्षक प्रशिक्षणासाठी गेल्यास विद्यार्थ्यांचे वर्ग बुडून त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. त्यामुळे परीक्षांच्या कालावधीत फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात प्रशिक्षण घेऊ नये, हे प्रशिक्षण स्थगित करून एप्रिलमध्ये घ्यावे.

- अनिल बोरनारे, भारतीय जनता पक्ष शिक्षक आघाडी