मुंबई : दक्षिण मुंबईतील नामांकित बाजारपेठ असलेल्या महात्मा फुले मंडई अर्थात क्रॉफर्ड मार्केटमधील दुकानदारांनी मंगळवारपासून बेमुदत बंदची घोषणा केली आहे. पालिका प्रशासनाकडून मार्केटमधील दुकानांची पुनर्बांधणी होणार असून, त्याचा दर्जा निकृष्ट असल्याचा दुकानदारांचा आरोप आहे.या प्रकरणी दुकानदारांची संघटना महात्मा फुले मार्केट दुकानदार सेवा संस्थेने सोमवारी मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद घेतली. त्यात संस्थेचे अध्यक्ष रत्नाकर कराळे म्हणाले की, गेल्या दोन वर्षांहून अधिक काळापासून मंडईच्या बाहेरील बाजूची डागडुजी करण्यात आली. मात्र, त्यानंतर गेल्या तीन महिन्यांपासून पालिकेने अंतर्गत कामे सुरू करताना दुकानांची पुनर्बांधणी सुरू केली आहे. त्याची माहिती दुकानदारांना देण्यात आली नाही. माहितीच्या अधिकारात दुकानदारांनी स्वत:हून ही माहिती मिळवली. त्यानंतर पालिकेने दुकानदारांना नमुना पद्धतीवर काही दुकाने बांधून दाखवली. मात्र, प्रत्यक्षात सुरू केलेल्या बांधकामाचा दर्जा हलक्या स्वरूपाचा आहे. त्याऐवजी दुकानदारांनी उभारलेली दुकाने अधिक मजबूत असल्याचा दावा कराळे यांनी केला आहे.मंडईच्या प्रवेशद्वार क्रमांक १ आणि ६ च्या आत प्रवेश करताच असलेल्या दोन मोकळ््या चौकातही पालिका बांधकाम करणार असून, त्याला संस्थेने विरोध दर्शवला आहे. कारण या मोकळ््या जागेत असलेला ज्योतिबा फुले यांचा पुतळा दुकानांमुळे झाकोळला जाईल. शिवाय एखाद्या आपत्कालीन परिस्थितीत एक आणि सहा क्रमांक गेटमधून ग्राहक, पर्यटक आणि दुकानदारांना बाहेर पडताना तारांबळ उडेल. त्यामुळे मोकळ््या जागेत कोणत्याही प्रकारची दुकाने उभारू नयेत, अशी मागणी संस्थेने केली आहे. (प्रतिनिधी)
क्रॉफर्ड मार्केट आजपासून बंद
By admin | Published: February 02, 2016 3:48 AM