क्रॉफर्ड मार्केट : गाळेधारकांचे प्रश्न निकाली काढण्याचे प्रशासनाला निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2020 02:37 PM2020-11-13T14:37:14+5:302020-11-13T14:38:31+5:30
BMC News : महात्मा फुले मंडईच्या विकास कामाची पाहणी
मुंबई : क्रॉफर्ड मार्केट येथील महात्मा फुले मंडईमधील गाळेधारकांचे प्रश्न निकाली काढण्याचे निर्देश महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रशासनाला दिले. काही दिवसापूर्वी क्रॉफर्ड मार्केट येथील महात्मा फुले मंडईला आग लागल्यानंतर येथील गाळेधारकांनी विविध समस्यांबाबत महापौरांकडे तक्रार केली होती.
महापौर पेडणेकर यांनी क्रॉफर्ड मार्केट येथील महात्मा फुले मंडईच्या विकास कामाची पाहणी केली. येथील कामाचा एकंदरीत आढावा घेतला. गाळेधारकांच्या तक्रारीची दखल घेऊन पेडणेकर यांनी महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत येथील गाळेधारकांसोबत चर्चा केली. तसेच त्यांचे प्रश्न निकाली काढण्याचे निर्देश सहाय्यक आयुक्त हांडे यांना दिले. ११ जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास दक्षिण मुंबईतील महात्मा ज्योतिबा फुले मंडई येथे (क्रॉफर्ड मार्केट) आग लागल्याची घटना समजताच पेडणेकर यांनी घटनास्थळाकडे तात्काळ धाव घेऊन अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून आगीच्या घटनेची सविस्तर माहिती जाणून घेतली. छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस जवळील महात्मा ज्योतिबा फुले मंडई ही हेरिटेज वास्तू असून याठिकाणी असलेल्या दुकानातील ज्वलनशील लाकडी पुठ्ठे यांनी पेट घेऊन मोठी आग लागण्याची भीती अग्निशमन दलाचे अधिकारी यांनी व्यक्त केली होती.