मुंबई : क्रॉफर्ड मार्केट परिसरातील पे ॲण्ड पार्किंगच्या बोर्डावरील दरनियम धाब्यावर बसवत मनमानी पद्धतीने पार्किंगचे पैसे उकळले जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ध्ये गुरुवारी प्रसिद्ध होताच महापालिकेने संबंधित कंत्राटदारावर कारवाईचा बडगा उगारला आहे. मुंबईकरांच्या खिशावर डल्ला मारणाऱ्या सदाफुले बचतगट या पार्किंग कंत्राटदाराचा मुदतवाढीचा करार पालिकेने रद्द केला असून, नवीन कंत्राटदार नियुक्त होईपर्यंत येथील पार्किंग फुकट ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लाेकमतने क्रॉफर्ड मार्केट येथील पार्किंगचे रिॲलिटी चेक केले हाेते. त्यावेळी कंत्राटदार ७० रुपयांऐवजी कुठे १५० तर कुठे ३०० रुपये आकारत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. ‘मुंबईकरांच्या खिशावर दरोडे’ या शीर्षकांतर्गत लोकमतच्या गुरुवारच्या अंकात या प्रकरणाचा पर्दाफाश करण्यात आला होता. या वृत्ताची दखल प्रशासनात वरिष्ठ पातळीवर घेण्यात आली.
तात्पुरत्या स्वरूपात फुकट पार्किंग - एमजेपी मार्केट १,२,३ पे ॲन्ड पार्क म्हणजे : - पोलिस आयुक्त कार्यालयासमोर जेजे फ्लायओव्हरला लागून असलेला आणि जेजे स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या समोरचा पहिला पार्किंग लॉट. - हॉटेल न्यू बंगालसमोरचा दुसरा पार्किंग लॉट. - क्रॉफर्ड मार्केट इमारतीबाहेरचा तिसरा पार्किंग लॉट. - या तीन ठिकाणी पुढील ठेकेदार नेमला जाईपर्यंत आजपासून माेफत पार्किंग असेल, असे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त जयदीप मोरे यांनी सांगितले.
सदाफुले बचतगट या कंत्राटदाराचा कंत्राट मुदतवाढीचा प्रस्ताव रद्द करण्यात आला. शिवाय त्यास ‘कारणे दाखवा’ नोटीसही बजावण्यात आली आहे. या कंत्राटदाराला दोन वर्षांसाठी कंत्राट देण्यात आले होते.
फलकावर इंजिनीअरचा संपर्क क्रमांक देणार‘ए’ वॉर्डातील पार्किंगच्या सर्व ठिकाणी पालिका आता मोठे फलक लावणार असून, त्यावर पार्किंगचा कंत्राटदार कोण आहे, पार्किंगचे दर, पार्किंग शुल्काबाबत किंवा अन्य तक्रारी असतील तर त्या थेट पालिकेकडे मांडता याव्यात यासाठी त्या फलकावर त्या वॉर्डातील इंजिनिअरचा संपर्क क्रमांकही असेल.
तीन वेळा दंडसदाफुले बचतगट या कंत्राटदाराला पे ॲण्ड पार्क कंत्राटाच्या अटी आणि शर्तींचा भंग केल्याबद्दल १९ डिसेंबर २०२३ रोजी सहा हजार रुपये, ३ जानेवारी रोजी नऊ हजार रुपये दंड ठोठावला होता. वरिष्ठांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी अतिरिक्त ५० हजार रुपयांचा दंडही आकारण्यात आला होता.
कंत्राटास मुदतवाढ का? संबंधित कंत्राटाची मुदत संपली होती. मुदतवाढीचा प्रस्ताव मंजूर झाला होता. मात्र आता तो रद्द करण्यात आला आहे. नवीन कंत्राटदाराची नियुक्ती होईपर्यंत दरम्यानच्या काळात महसूल बुडू नये म्हणून जुन्या कंत्राटदारास तीन महिने मुदतवाढ दिली जाते. परंतु सदाफुले बचतगट या कंत्राटदारास मुदतवाढ दिली जाणार नाही.