Join us

‘क्रॉफर्ड’चा पुनर्विकास गुंडाळला, पालिका स्वत:च करणार दुरुस्ती

By admin | Published: September 28, 2016 12:55 AM

गेल्या दशकभरापासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या वादग्रस्त महात्मा ज्योतिबा फुले म्हणजेच प्रसिद्ध क्रॉफर्ड मार्केटची प्रतीक्षा अखेर संपण्याची चिन्हे आहेत. पुरातन वास्तू समितीने

मुंबई : गेल्या दशकभरापासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या वादग्रस्त महात्मा ज्योतिबा फुले म्हणजेच प्रसिद्ध क्रॉफर्ड मार्केटची प्रतीक्षा अखेर संपण्याची चिन्हे आहेत. पुरातन वास्तू समितीने रेड सिग्नल दाखविल्याने आता मुंबई महापालिका स्वत:च या मंडईची दुरुस्ती करणार आहे. त्यामुळे पुनर्विकासाचा प्रस्ताव अखेर रद्द करण्यात आला आहे. मुंबईतील मंडईच्या पुनर्विकासासाठी नियमावली तयार करण्यात आली. त्यानंर पालिकेने या मंडईमधील गाळेधारकांकडून संमती पत्रे घेऊन पुनर्विकासाचा प्रस्ताव तयार केला. पहिल्या टप्यात १८ मंडईचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. परंतु फोर्टमधील क्रॉफर्ड मार्केटच्या पुनर्विकासासाठी गाळेधारकांनी परिशिष्ट दोन बनवून विकासकांची नेमणूक करीत महापालिकेकडे प्रस्ताव पाठविला. या प्रस्तावाला सुधार समितीची मंजुरीही मिळाली. मात्र हा प्रस्ताव पालिकेच्या महासभेत फेटाळण्यात आला. अखेर राज्य सरकारने हस्तक्षेप करीत मंडईच्या पुनर्विकासाला स्थगिती दिली. यावर अंतिम निर्णय घेण्यासाठी तत्कालिन अतिरिक्त आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव यांची चौकशी समिती स्थापन झाली. या समितीने पुरातन वास्तू समिती, पर्यावरण आणि वन खात्याची परवानगी आवश्यक असल्याचा शेरा दिला. त्यामुळे या अहवालावर पालिका महासभेत चर्चा होऊन तो प्रस्ताव दप्तरी दाखल करण्यात आला. दरम्यान, पुरातन वास्तू समितीनेही परवानगी नाकारल्यामुळे पालिकेने सर्वच मंडर्इंच्या पुनर्विकासाचा निर्णय घेतला असल्याने क्रॉफर्ड मार्केटचा प्रस्ताव गुंडाळण्यात आला आहे. (प्रतिनिधी)प्रस्ताव रद्द : महापालिकाच आता या मंडईचा पुनर्विकास करणार असून, परिशिष्ट दोनची यादीच रद्द करण्यात आली आहे. पुनर्विकासाचा प्रस्ताव रद्द करून सुधार समितीच्या बैठकीत माहितीसाठी सादर होणार आहे. मुंबईत ९२ मंडया असून, १८ मंडर्इंच्या दुरुस्तीचा निर्णय झाला होता. मात्र, पालिकेने आता विकासकांमार्फत ही दुरुस्ती व पुनर्विकास न करता, स्वत:च हे काम हाती घेण्याचे ठरविले आहे. क्रॉफर्डबद्दल... क्रॉफर्ड मार्केट हे नाव मुंबई महानगरपालिकेचे प्रथम आयुक्त ‘आर्थर क्रॉफर्ड’ यांच्यामुळे ठेवण्यात आले. १८६९ साली त्याचे बांधकाम पूर्ण झाले. नॉर्मन आणि फ्लेमिश शैलीत बांधलेल्या वास्तूसाठी ‘कुर्लास्टोन’चा वापर करण्यात आला आहे. प्रख्यात लेखक रुडयार्ड किपलिंगचे वडील ‘लॉकवूड किपलिंग’ यांनी या वास्तूच्या शिल्पांसाठी आपले योगदान दिले होते. या मार्केटचा आकार २२,४७१ चौमीटर इतका आहे. विजेचे दिवे आलेली भारतातील ही मार्केटची पहिली इमारत आहे.अनन्यसाधारण महत्त्वक्रॉफर्ड मार्केट मुंबईतील अत्यंत महत्त्वाच्या स्थानावर आहे, आजही त्याचे स्थान तितकेच महत्त्वाचे आहे. या मार्केटचा आराखडा युरोपीय धरतीवर केला गेला असला, तरी त्यामध्ये भारतीय किंवा दक्षिण आशियाई जीवनमानाचे प्रतिबिंब पडले आहे. मार्केटच्या आत असणाऱ्या कारंजामध्ये तर दक्षिण आशियाई फळे, फुले आणि प्राण्यांची प्रतीके वापरण्यात आली आहेत. केवळ वरवरचे कॉस्मेटिक स्वरूपाचे बदल न होता, आतील भागाचाही विचार केला पाहिजे. - राहुल चेंबूरकर, स्थापत्यविशारद आणि स्थापत्य अभ्यासक