महामार्गांवरील अपघात व मृत्यू कमी करण्यासाठी एका आठवड्यात कृती आराखडा तयार करा : सतेज पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:09 AM2021-09-14T04:09:23+5:302021-09-14T04:09:23+5:30
‘सेव्ह लाईफ फाऊंडेशन’ने सरकारला सादर केलेल्या एका अहवालातील आकडेवारीची दखल घेत पाटील यांनी राष्ट्रीय महामार्गांवर होणारे अपघात टाळणे ...
‘सेव्ह लाईफ फाऊंडेशन’ने सरकारला सादर केलेल्या एका अहवालातील आकडेवारीची दखल घेत पाटील यांनी राष्ट्रीय महामार्गांवर होणारे अपघात टाळणे व ते कमी करणे यासाठी सतेज पाटील यांनी नुकत्याच एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन केले होते. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून घेतलेल्या या बैठकीला पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, परिवहन आयुक्त डॉ अविनाश ढाकणे, विशेष महानिरीक्षक मनोज लोहिया, पुणे, सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, या जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक, महामार्ग पोलीस दलातील अधिकारी तसेच सेव्ह लाईफ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पीयूष तिवारी आदी मान्यवर उपस्थित होते.
‘सेव्ह लाईफ फाऊंडेशन’कडून पुणे-सातारा आणि सातारा-कागल या दोन महामार्गांवरील अपघातांची आकडेवारीचा अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यानुसार विरुद्ध बाजूने येणाऱ्या वाहनांमुळे पुणे-सातारा महामार्गावर २५ तर सातारा-कागल महामार्गावर ६२ अपघात नोंदविले गेले आहेत. पुणे-सातारा मार्गावर १०९ आणि सातारा-कागल मार्गावर २०५ अपघात हे चुकीच्या मार्गिकाच्या वापरामुळे नोंदविले गेले होते. डावीकडून ओव्हरटेक करण्याचे ३ प्रकार पहिल्या महामार्गावर तर ४० दुसऱ्या महामार्गावर नोंदविले गेले. पुणे-सातारा महामार्गावर अनधिकृत पार्किंगच्या १४५ तर सातारा-कागल महामार्गावर ९९ घटना नोंदविल्या गेल्या आहेत. दुचाकीस्वारांनी हेल्मेट न घालण्याचे अनुक्रमे १०३ आणि १६० प्रकार या दोन महामार्गांवर नोंदविले गेले आहेत.
--
वाहतूक नियमांचे पालन करणे गरजेचे
अपघातामधील बरेचसे मृत्युमुखी पडलेले लोक हे युवक आणि कुटुंबे असलेली आहेत. त्यामुळे या अपघातामुळे होणारे नुकसान हे अपरिमित आहे. यातील काही अपघात हे नैसर्गिक बाबींमुळे घडलेले असले तरी, तब्बल ९० टक्के अपघात हे मानवी चुकांमुळे झाले असल्याचे आतापर्यंतच्या अनेक अहवालामधून समोर आले आहे. महाराष्ट्र सरकार आपल्या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. पण त्याचवेळी आपण सर्वांनीसुद्धा प्रवास करत असताना सर्व वाहतूक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
सतेज पाटील, गृह व परिवहन राज्यमंत्री