- अमर माेहितेमुंबई : रूग्णाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईक डॉक्टर, नर्स, वॉर्ड बॉय व अन्य कर्मचाऱ्यांना मारहाण करतात. रूग्णालयाची तोडफोड करतात. हे प्रकार रोखण्यासाठी ॲक्शन प्लॅन तयार करा, असे आदेश लोकायुक्त व्ही. एम. कानडे यांनी पोलीस महासंचालक, मुंबई, ठाणे, पुणे पोलीस आयुक्त यांना दिले आहेत.डॉक्टरांना मारहाणीचे प्रकार गेल्या काही दिवसांत वाढले आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी कायदा आहे. मात्र त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हायला हवी. काही वेळा कायदे असून ते केवळ कागदावरच राहतात. तसे न होता त्याची अंमलबजावणी व्हायला हवी, असे मत लोकायुक्त कानडे यांनी व्यक्त केले.डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी असलेल्या कायद्याची अंमलबावणी करण्यासाठी नेमके काय केले आहे. काही ॲक्शन प्लॅन आहे का. असल्यास तो सादर करावा अन्यथा यासाठी ॲक्शन प्लॅन तयार करावा, असे लोकायुक्त कानडे यांनी आदेशात नमूद केले आहे. जालना येथे एका रूग्णालयात रूग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी डॉक्टरला मारहाण केली. रूग्णालयाची तोडफोड केली. त्यावेळी तेथे व्हिडिओ शुटिंग करणारे शिवराज नारीयावाले यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना मारहाण केली. त्या पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी करणारा अर्ज त्याने लोकायुक्त यांच्याकडे केला. मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई झाली आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. याप्रकरणाची दखल घेत लोकायुक्त कानडे यांनी हे आदेश दिले.तसेच मुंबई, ठाणे व पुणे येथील पोलीस आयुक्त यांनी पुढील सुनावणीला स्वत: हजर रहावे, अथवा त्यांच्या प्रतिनिधींनी हजर रहावे. डॉक्टर संरक्षण कायद्यातंर्गत नेमके काय केले गेले आहे, याची माहिती द्यावी, असेही लोकायुक्त कानडे यांनी आदेशात नमूद केले आहे.
डॉक्टर, नर्सवरील हल्ल्यांवर ॲक्शन प्लॅन तयार करा; लोकायुक्तांचे पोलीस महासंचालकांना आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 8:53 AM