वरळीचा हुबेहुब त्रिमितीय नकाशा तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:07 AM2021-09-25T04:07:17+5:302021-09-25T04:07:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : वरळी परिसराचा सुमारे दहा चौरस किलोमीटर क्षेत्राचा त्रिमितीय नकाशा तयार करुन डिजिटल स्वरूपातील ‘प्रतिवरळी’ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वरळी परिसराचा सुमारे दहा चौरस किलोमीटर क्षेत्राचा त्रिमितीय नकाशा तयार करुन डिजिटल स्वरूपातील ‘प्रतिवरळी’ महापालिकेने साकारली आहे. प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आलेला हा प्रकल्प मुंबई महानगराच्या नागरी प्रशासनासाठी मोलाचा ठरणार आहे. यानिमित्ताने, थ्री डी मॅपिंग असणाऱ्या जागतिक शहरांच्या यादीमध्ये मुंबईचा प्रवेश झाला असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.
वाढती लोकसंख्या व विस्तारणारा भौगोलिक परिसर पाहता मूलभूत नागरी सेवा-सुविधा पुरवणे, पायाभूत सुविधांची निर्मिती करणे, मोठे प्रकल्प राबविणे हे प्रशासकीयदृष्ट्या आणि इतरही कारणांनी मोठे आव्हान ठरते. यावर तोडगा काढण्यासाठी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेवरून थ्री डी मॅपिंग करण्यात आले. प्रायोगिक तत्त्वावर जी/दक्षिण विभागातील वरळी परिसराचा सुमारे १० चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचा त्रिमितीय नकाशा तयार करण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
थ्री डी मॅपिंग करणारा पहिला विभाग...
जीआयएस, एसएपी, रोबोट, ड्रोन अशा नवनवीन तंत्रज्ञान आणि त्यानुरूप साधनांचा स्वीकार जी/दक्षिण विभागाने केला आहे. थ्री डी मॅपिंग करणारा मुंबईतील पहिला प्रशासकीय विभाग म्हणूनदेखील जी/दक्षिण विभागाची नोंद झाली असल्याचे अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी सांगितले.
यासाठी थ्री डी मॅपिंग आवश्यक....
थ्री डी मॅपिंग अर्थात त्रिमितीय नकाशा पद्धतीने कोणत्याही परिसराचे आभासी परंतु हुबेहूब रुप पाहता येते. संपूर्ण ३६० अंशातील अवलोकन करून, उंची-रुंदी, खोली, जाडी अशा सर्व पैलूंनी तो परिसर पाहता येतो. कोणताही बदल झाला तर लगेच प्रत्यक्षात पडताळता येते व पुरावा म्हणून त्याचा उपयोगही करता येतो, अशी माहिती जी दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांनी सांगितले.
जिओस्पेशियल मॉडेलचे महत्व...
भूस्थानिक नकाशा अर्थात जिओस्पेशियल मॉडेल हे नागरी प्रशासनासाठी महत्त्वाचे आहेत. फक्त प्रकल्पांची अंमलबजावणीच नव्हे तर पायाभूत सेवा-सुविधांचे योग्य नियोजन करून त्यांचा दर्जा उंचावणे, नागरी सेवा-सुविधांचे मूल्यमापन करणे, आपत्ती व्यवस्थापन प्रभावीरीत्या करणे, वातावरण बदलांच्या प्रभावाचे विश्लेषण करणे, जनतेची सुरक्षितता अशा अनेक बाबींमध्ये या त्रिमितीय नकाशा तंत्रज्ञानाची मदत होते.