मांसविक्री करणाऱ्या दुकानांचे सर्वेक्षण करून स्वच्छता आराखडा तयार करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:14 AM2021-01-13T04:14:34+5:302021-01-13T04:14:34+5:30
पालिका प्रशासनाचे निर्देश : बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक सूचना जाहीर मुंबई : बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मांस आणि मटणविक्रेत्यांच्या ...
पालिका प्रशासनाचे निर्देश : बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक सूचना जाहीर
मुंबई : बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मांस आणि मटणविक्रेत्यांच्या दुकानांचे सर्वेक्षण करून स्वच्छता आराखडा तयार करावा, असे निर्देश पालिका प्रशासनाने बाजार विभागाच्या सहायक आयुक्तांना दिले. साेबतच मृत पक्ष्यांची विल्हेवाट लावताना चुनखडीचा पुरेसा वापर करावा, अशी सूचनाही करण्यात आल्या आहेत.
राज्याचा पशुसंवर्धन विभाग आणि महापालिका यांच्या समन्वयाने बर्ड फ्लू रोगासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, मुंबईत पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचे आढळल्यास आपत्कालीन विभागातील हेल्पलाइन क्रमांक १९१८ यावर संपर्क साधावा. हेल्पलाइनवर आलेल्या तक्रारींचे निवारणासाठी आप्तकालीन विभाग, संबंधित सहायक आयुक्त कार्यालयात किंवा वॉर्ड वॉररुममार्फत कार्यवाही केली जाईल.
घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या सहायक अभियंत्यांच्या आदेशानुसार कर्मचारी आणि श्रमिक कामगार मृत पक्ष्यांची विल्हेवाट लावतील. तसेच मटण विक्रते, कुक्कुटपालन आणि नागरिक यांच्यामध्ये बर्ड फ्लू रोगाचा प्रादुर्भाव व प्रसाराबाबत पशुवैद्यकीय आरोग्य विभागामार्फत आय.ई.सी. अंतर्गत जनजागृती करावी, अशा सूचनाही पालिकेने नियमावलीत केल्या आहेत.
- येथे साधा संपर्क :
मृत पक्षी आढळल्यास शासनाने नियुक्त केलेल्या रॅपिट रिस्पॉन्स टीममधील डॉ. हर्षल भोईर - ९९८७२८०९२१ आणि डॉ. अजय कांबळे - ९९८७४०४३४३ यांच्याशी किंवा १९१८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.
-----------------------------------------