बालमृत्यू रोखण्यासाठी ‘मेळघाट अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार करा; आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 05:34 AM2019-01-28T05:34:21+5:302019-01-28T05:34:45+5:30

विविध विभागांशी समन्वय साधून अमलात आणणार

Create 'Melghat Action Plan' to prevent infant death; Health Minister Eknath Shinde's directions | बालमृत्यू रोखण्यासाठी ‘मेळघाट अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार करा; आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

बालमृत्यू रोखण्यासाठी ‘मेळघाट अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार करा; आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

googlenewsNext

मुंबई : मेळघाटातील बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी महिला व बालविकास, आदिवासी विकास, अन्न व नागरी पुरवठा यांसह अन्य विविध विभागांशी समन्वय साधून आवश्यक त्या उपाययोजनांचा ‘मेळघाट अ‍ॅक्शन प्लॅन’ तातडीने तयार करावा, असे निर्देश आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी दिले.

मेळघाटातील बालमृत्यूचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात आयोजित बैठकीत आरोग्यमंत्री शिंदे बोलत होते. अमरावती जिल्ह्यातील धारणी आणि चिखलदरा या तालुक्यात कुपोषणामुळे बालमृत्यूचे प्रमाण वाढले आहे. यासंदर्भात आवश्यक त्या सर्व उपाययोजना करून, या भागातला बालमृत्यू दर शून्यावर आणण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असे शिंदे यांनी सांगितले.

सरकारी उपाययोजनांसोबतच टाटा ट्रस्टसारख्या अन्य सामाजिक संस्थांचे साहाय्य घ्यावे, तसेच सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर) मेळघाटमध्ये आरोग्य सुविधांचे बळकटीकरण, त्याचबरोबर या भागात सेवा देणारे डॉक्टर्स, नर्स यांच्याकरिता उत्तम अशा पायाभूत सुविधांची उभारणी, आदिवासी बांधवांना रोजगार, वीजपुरवठा, मोबाइल संपर्क यंत्रणा उभारणे या सर्व बाबींचा समावेश असलेला एकत्रित असा ‘मेळघाट अ‍ॅक्शन प्लॅन’ त्वरित तयार करावा. या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून हा प्लॅन अमलात आणण्याकरिता प्रयत्न करण्यात येतील, असे शिंदे यांनी सांगितले.

‘स्वाइन फ्लू’साठी पाच कलमी कार्यक्रम
याशिवाय, वातावरणातील बदलामुळे राज्यात काही ठिकाणी स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव जाणवत आहे. त्यामुळे स्वाइन फ्लू प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी विभागाने पाच कलमी कार्यक्रम राबवावा, असे निर्देशही शिंदे यांनी दिले. राज्यात आतापर्यंत एक लाख ७७ हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी १,७६४ संशयित रुग्णांना आॅसेलटॅमिवीर गोळ्या देण्यात आल्या असून, बाधित रुग्णांची संख्या ६६ एवढी आहे. सध्या राज्यात सर्वत्रच मोठ्या प्रमाणावर थंडी जाणवत आहे. काही भागांत पाऊसदेखील पडला आहे. हे वातावरण स्वाइन फ्लूचे विषाणू फैलावण्यासाठी पोषक असल्याने रुग्णसंख्या वाढत आहे. एरव्ही राज्यात जुलै ते सप्टेंबर या कालावधीत आणि फेब्रुवारी व मार्च या काळात रुग्ण आढळून येतात. या वर्षी मात्र जानेवारी महिन्यामध्ये हवामान बदलाचा परिणाम म्हणून स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून येत असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

 

Web Title: Create 'Melghat Action Plan' to prevent infant death; Health Minister Eknath Shinde's directions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.