Join us

मुंबईत विकसित होत असलेल्या फ्लायओव्हर ब्रिजखाली उद्यानांची निर्मिती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 4:06 AM

मुंबई : मुंबईच्या माटुंगा फ्लायओव्हर ब्रिजच्या खाली अतिशय सुंदर असे गार्डन बनविण्यात आले आहे ज्याचे नाव आहे ‘नानालाल मेहता ...

मुंबई : मुंबईच्या माटुंगा फ्लायओव्हर ब्रिजच्या खाली अतिशय सुंदर असे गार्डन बनविण्यात आले आहे ज्याचे नाव आहे ‘नानालाल मेहता गार्डन’. त्याच धर्तीवर आपल्या बोरीवली पश्चिम व पूर्वेकडे बनत असलेल्या प्रत्येक ब्रिजखाली वेगवेगळ्या संकल्पना योजून उद्याने विकसित करावीत व आपल्या नागरिकांना अनोखी भेट द्यावी. सदर मागणी ही भारतीय जनता पक्षाचे बोरीवली उपाध्यक्ष सुधीर परांजपे यांनी उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्याकडे २२ जून रोजी केली होती. ‘लोकमत’ने २६ जून रोजी यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केले होते.

बोरीवलीत व संपूर्ण मुंबईत मुंबई मेट्रो वन तसेच मुंबई महानगरपालिकेतर्फे अनेक फ्लायओव्हर ब्रिज सध्या पूर्व व पश्चिमेस बनविण्यात येत असून, त्यांचे काम प्रगतिपथावर आहे. या ब्रिजखालील जागेचा वापर नंतर अनेकदा भंगार ठेवणे, झोपडपट्टी वा बहुतेक गैरकामांसाठीच केला जातो. हे टाळण्यासाठी खासदार शेट्टी यांनी २२ जून रोजी मुंबई मनपा आयुक्त इक्बालसिंह चहल यांना पत्र लिहून सुधीर परांजपे यांनी केलेल्या मागणीचा निश्चित विचार करून नानालाल मेहता उद्यानाच्या धर्तीवर बोरीवली, उत्तर मुंबई व संपूर्ण मुंबईत अशा उद्यानांच्या विकासासाठी आग्रही भूमिका घेतली.

याबाबत त्यांनी आयुक्तांकडे सातत्याने पाठपुरावा करून व २२ ऑक्टोबर रोजी मनपा आयुक्तांना दिलेल्या स्मरणपत्राचे फलस्वरूप म्हणून एच पूर्व कलानगर खेर नगर फ्लायओव्हर ब्रिजखाली खा. गोपाळ शेट्टी यांनी मांडलेल्या संकल्पनेच्या आधारावर एक सुंदर उद्यान बांधण्याचे काम सध्या सुरू आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

मनपा आयुक्तांनी शेट्टी यांनी केलेली मागणी उचलून धरून त्यावर काम सुरू केल्याबद्दल शेट्टी यांनी समाधान व्यक्त केले. येणाऱ्या आगामी काळात ‘स्वच्छ मुंबई - हरित मुंबई’चे स्वप्न साकार करून मुंबईत परिवर्तन करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

------------------------------------------