Join us

बाल वैज्ञानिकांसाठी पोषक वातावरण तयार करा!

By admin | Published: December 23, 2015 12:48 AM

राज्यात ठिकठिकाणी विज्ञान प्रदर्शन सुरू असून विद्यार्थ्यांसह, शिक्षक, पालक आणि विज्ञानप्रेमींकडून त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

मुंबई : राज्यात ठिकठिकाणी विज्ञान प्रदर्शन सुरू असून विद्यार्थ्यांसह, शिक्षक, पालक आणि विज्ञानप्रेमींकडून त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मात्र मुंबई, ठाणे, नवी मुंबई अशा महापालिका क्षेत्रांतील प्रत्येक शाळेकडून प्रवेश शुल्क आणि टेबल भाड्याच्या नावाखाली अव्वाच्या सव्वा शुल्क आकारणी केली जात असल्याचा आरोप काँग्रेस शिक्षक सेलने केला आहे. त्यामुळे प्रवेश शुल्कावर नियंत्रण आणून बाल वैज्ञानिकांना पोषक वातावरण निर्माण करण्याची मागणी शिक्षक सेलने केली आहे.मुंबईसह ठाणे, नवी मुंबई परिसरात विज्ञान प्रदर्शनात सामील होण्यासाठी इच्छुक शाळांकडून ५०० ते एक हजार रुपये प्रवेश शुल्क आकारले जात असल्याचा आरोप शिक्षक सेलचे उपाध्यक्ष महादेव सुळे यांनी केला आहे. सुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, टेबल भाडे म्हणूनही शाळांकडून प्रत्येकी १५० रुपयेही आकारले जात आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस प्रदर्शनामध्ये सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मात्र रोडावत आहे. कारण प्रवेश शुल्काशिवाय विद्यार्थ्यांना प्रकल्पासाठी येणारा खर्च शाळा प्रशासनांना डोईजड होत आहे. परिणामी देशाचे भावी वैज्ञानिक घडण्यासाठी या बाल वैज्ञानिकांना प्रोत्साहन द्यायचे असेल तर प्रशासनाने याबाबत योग्य ती कारवाई करण्याची मागणी सुळे यांनी केली आहे.ठाणे महापालिका क्षेत्रात सुमारे ४५० प्राथमिक व माध्यमिक शाळा आहेत. मात्र विज्ञान प्रदर्शनांमध्ये त्यातील केवळ ९३ प्रकल्प व ८० शाळा सामील झाल्या आहेत. यावरून प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत असताना स्पर्धांमधील स्पर्धकांची संख्या मात्र घटत असल्याचे निदर्शनास येते. परिणामी त्यासाठी कारणीभूत असलेल्या कारणांचा सरकारने गांभीर्याने विचार करण्याचे आवाहन शिक्षक सेलने केले आहे.१महापालिका क्षेत्रातील प्रदर्शनासाठी कोणत्याही प्रकारचा निधी उपलब्ध होत नसल्याची व्यथा विज्ञान प्रदर्शनाची जबाबदारी असणाऱ्या शिक्षण विभागाच्या विस्तार अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. २निधीअभावी येणारा खर्च प्रवेश शुल्कातून वसूल करत असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले. अधिकाऱ्यांच्या या वक्तव्याबाबत शिक्षक व मुख्याध्यापकांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे.