उच्च न्यायालयात जनहित याचिका; काेविन वापरण्यास योग्य नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : लस बुक करण्यासाठी मुंबईकरिता स्वतंत्र पोर्टल असावे, यासाठी एका शिक्षिकेने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. कोविन पोर्टल हे वापरण्यास योग्य नसल्याचे याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे.
कोविन पोर्टल सुरू करण्याची ठरावीक वेळ नाही. त्यामुळे नागरिकांना लस घेण्याची वेळ ठरविण्यासाठी पोर्टल ठरावीक वेळेत सुरू करणे आवश्यक आहे, असे अंधेरीच्या रहिवासी व शिक्षिका योगिता वंजारा यांनी याचिकेत म्हटले आहे.
लसीकरण केंद्रात गेलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना लस मिळेल, याची खात्री सरकारने करावी; कारण लस उपलब्ध असल्यावर कोणालाही लस देण्याची प्रवृत्ती सरकारची आहे. कोविन पाेर्टल सुरू करण्याची व त्यावरून लस घेण्याची वेळ निश्चित करण्याची कोणतीच सोय उपलब्ध नाही. त्यामुळे पोर्टल केव्हा सुरू होईल, यावर लक्ष ठेवण्यासाठीच १८-४४ वयोगटातील नागरिकांचा वेळ वाया जात आहे, असे वंजारा यांनी याचिकेत म्हटले आहे.
आर्थिक मागास समाजासाठी लस घेणे कठीण आहे; कारण त्यांना तांत्रिक बाबींची माहिती नसते. ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगस्नेही लसीकरण केंद्रांची माहितीही कोविन पोर्टलवर नाही. लस घेण्यासाठी केलेले बुकिंग आपोआप रद्द होत आहे. त्यानंतर नागरिक पुन्हा लस बुक करू शकत नाहीत. या सर्व धर्तीवर मुंबईसाठी स्वतंत्र पोर्टल तयार करण्याची मागणी याचिकाकर्तीने केली आहे.
* पोर्टल सक्रिय होण्याची वेळ विचित्र !
पोर्टल सक्रिय होण्याची वेळ विचित्र आहे. अनेक लसीकरण केंद्रांत लस घेण्यासाठी मध्यरात्रीची वेळ उपलब्ध असल्याचे दाखवितात आणि ती वेळ बुक करायला गेल्यावर लगेच अन्य कोणीतरी बुक केल्याचे दाखवितात. ही स्थिती टाळण्यासाठी मुंबई महापालिकेने पूर्वनिर्धारित वेळी लस बुकिंग स्लॉट सुरू करावा आणि त्याची नागरिकांना आठवडाभर आधी माहिती देण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे.
-----------------------