Join us

सीईटीसाठी सर्व बोर्डांच्या विद्यार्थ्यांकरिता सामायिक प्रश्नपत्रिका तयार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 4:06 AM

उच्च न्यायालयाची राज्य सरकारला सूचनालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : २१ ऑगस्ट रोजी अकरावीच्या प्रवेशाकरिता घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश ...

उच्च न्यायालयाची राज्य सरकारला सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : २१ ऑगस्ट रोजी अकरावीच्या प्रवेशाकरिता घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षेसाठी (सीईटी) सामायिक प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी सर्व बोर्डांची मिळून एक समिती नेमा, अशी सूचना उच्च न्यायालयाने राज्य सरकारला बुधवारी केली. या प्रश्नपत्रिकेमध्ये एसएससीव्यतिरिक्त अन्य बोर्डांच्या अभ्यासक्रमाशी संबंधित प्रश्न असतील. जेणेकरून सर्व बोर्डांच्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येईल, असे उच्च न्यायालयाने म्हटले.

सीईटीमध्ये मिळणाऱ्या गुणांवरून अकरावीत प्रवेश देण्यात येईल व ही सीईटी एसएससी बोर्डाच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल, अशी अधिसूचना राज्य सरकारने २८ मे रोजी काढली. या अधिसूचनेला आयसीएसई बोर्डाची विद्यार्थिनी अनन्या पत्की हिने उच्च न्यायालयात आव्हान दिले. या याचिकेवरील सुनावणी न्यायमूर्ती रमेश धानुका व न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढे होती.

गेल्या सुनावणीत न्यायालयाने राज्य सरकारकडे सर्व बोर्डांच्या विद्यार्थ्यांना स्वतंत्र अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्याची परवानगी नसेल तर सीईटी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनाच प्राधान्याने प्रवेश देण्यात येईल, ही अट मागे घेण्यात येईल का? अशी विचारणा केली होती. बुधवारच्या सुनावणीत मुख्य सरकारी वकील पूर्णिमा कंथारिया यांनी न्यायालयाला सांगितले की, अद्याप त्यांना याबाबत सूचना देण्यात आलेल्या नाहीत. तसेच आतापर्यंत सीईटीला बसण्याकरिता किती विद्यार्थ्यांनी नोंदणी केली, याचीही माहिती आपल्याकडे उपलब्ध नाही.

पश्चिम महाराष्ट्र व अन्य भागांमध्ये पूर आल्याने ऑनलाईन नोंदणीचे काम ठप्प झाले. सोमवारी दुपारपासून नोंदणी पुन्हा सुरू करण्यात आली. आणखी तीन दिवस वाढवून देण्यात आले आहेत. त्यावेळी एसएससी व्यतिरिक्त अन्य बोर्डांचे किती विद्यार्थी सीईटीला बसणार आहेत, हे स्पष्ट होईल, अशी महिती सरकारी वकिलांनी न्यायालयाला दिली.

‘या परिस्थितीवर तोडगा काढा अन्यथा आम्ही मार्ग काढू. आम्ही तुम्हाला कोणत्याही बोर्डाच्या विद्यार्थ्याला वगळू देणार नाही,’ असे न्यायालयाने म्हटले.

सीईटीसाठी सर्व बोर्डांच्या अभ्यासक्रमाची मिळून एक सामायिक प्रश्नपत्रिका तयार करा तसेच त्यांना पर्यायी प्रश्नही द्या. जेणेकरून दहावीच्या परीक्षेसाठी त्यांनी जे विषय निवडले होते, त्या विषयांशी संबंधित आलेल्या प्रश्नांची ते उत्तरे देऊ शकतील, अशीही सूचना न्यायालयाने सरकारला केली.

सर्व बोर्डांच्या अभ्यासक्रमाची मिळून एक सामायिक प्रश्नपत्रिका तयार करणे अशक्य आहे. कारण एसएससी बोर्डाचे विद्यार्थी अन्य बोर्डांच्या अभ्यासक्रमातून आलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नाहीत, असे कंथारिया यांनी न्यायालयाला सांगितले.

गेल्याच आठवड्यात आयसीएसई बोर्डाचा ९९.९८ टक्के निकाल लागला. बहुतांशी विद्यार्थी ९० टक्क्यांवर आहेत. त्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्यांच्या बोर्डाच्या कनिष्ठ महाविद्यालयांत प्रवेश घेण्यासाठी अर्ज केला आहे, अशी माहिती कंथारिया यांनी न्यायालयाला दिली.

अनन्याचे वडील योगेश पत्की यांनी न्यायालयापुढे भीती व्यक्त केली की, जर राज्य सरकारने तोडगा न काढताच सीईटीची नोंदणी बंद केली तर? त्यावर न्यायालयाने सर्व बोर्डांचे विद्यार्थी सीईटीसाठी नोंदणी करू शकतात, असे स्पष्ट करत या याचिकेवरील सुनावणी ४ ऑगस्ट रोजी ठेवली.