मनोहर कुंभेजकर
मुंबई - मुंबईत पाऊस पडला की मुंबईकर जीव मुठीत घेऊन राहतो. मुंबईत 50 मिमी जरी पाऊस पडला तरी मुंबई ठप्प होते अशी थातूरमातुर कारणे दिली जातात. पालिका उपाय योजनांच्या नावाखाली करोडो रुपये खर्च करते तरी ठिकठिकाणी मुंबईत पाणी तुंबते, मुंबईची वाहतूक व्यवस्था कोलमडते, तर अनेक वेळा मुंबईची धमनी असलेली रेल्वे देखील बंद पडते. त्यामुळे दरवर्षी मुंबईकरांना पावसाळ्यात भेडसावणाऱ्या समस्यांमधून मुंबईकरांची कायमची मुक्तता करायची असेल तर येणाऱ्या नव्या विकास आराखड्यात टास्क फोर्स निर्माण करावा अशी आग्रही मागणी विलेपार्ले विधानसभा मतदार संघाचे भाजपा आमदार अँड. पराग अळवणी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
पालिकेचे अधिकारी दर तीन वर्षे झाले की बदलतात, नवीन अधिकारी येतो आणि मग प्रश्न काही सुटत नाही. त्यामुळे जसे एमएमआरडीएची वॉर रुम आहे. त्याप्रमाणे मुंबईतील पाणी तुंबण्याची ठिकाणे कोणती आहेत. त्यावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी आणि प्रश्न सोडवण्यासाठी पालिकेतील तज्ञ अधिकाऱ्यांची टीम असलेला टास्क फोर्स तयार करावा असे आपले ठाम मत असल्याचे अँड. अळवणी यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले. मुंबईसाठी टास्क फोर्स स्थापन करा अशी मागणी त्यांनी नुकत्याच संपलेल्या नागपूर अधिवेशनात केली होती याची माहिती त्यांनी दिली.
सांताक्रूझ येथील मिलन सब वे येथे गेली अनेक वर्षे पावसाळ्यात पाणी तुंबत होते. आपण 1997 ते 2007 पर्यंत नगरसेवक होतो. 2014 साली विलेपार्ले येथील आमदार झालो. आपली पत्नी अँड.ज्योती अळवणी ही 2012 पासून येथील नगरसेविका आहे. मिलन सबवेत पाणी का तुंबते याचा आम्ही डिटेल टेक्निकल अभ्यास केला. पाणी तुंबण्याची 12 कारणे शोधून काढली. ११ कारणे आम्ही सोडवली. मात्र 12 वे कारण म्हणजे येथील श्रद्धानंद नाल्याच्या रुंदीकरणाचा प्रश्न सुटत नव्हता. त्यामुळे हा प्रश्न सोडवण्याचा आम्ही दोघांनी दृढ निश्चय केला. येथील श्रद्धानंद नाला रुंदीकरणाच्या आड येणाऱ्या 15 झोपड्यांना पर्यायी घरे दिली. या झोपड्यांना अभय देण्यासाठी आणि हा प्रश्न प्रलंबित ठेवण्यासाठी आमच्यावर विरोधकांनी खोट्या केसेस टाकल्या. माझ्या पत्नीच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला. मात्र आम्ही खंबीरपणे उभे राहून येथील भागात गेली अनेक वर्षे पाणी तुंबण्यावर प्रभावी उपाय योजना केल्या.
पाणी तुंबण्याचा प्रश्न सोडावण्याचा निर्धार करून 11 ते 12 वर्षांच्या आमच्या अथक प्रयत्नानंतर कायमचा सोडावला. याचे फलित म्हणून आज मिलन सब वे, वीर मकरंद घाणेकर मार्ग, संत चोखामेळा रस्ता, श्रद्धानंद रोड, एन. पी.ठक्कर रोड, दीक्षित रोड, नेहरू रोड, मोंगिभाई मार्केट, मालविया रस्ता इत्यादी विविध ठिकाणी आता पाणी तुंबत नाही. गेली दोन वर्षे पाणी तुंबत नसल्यामुळे आणि पूर्वी न विकली जाणारी येथील घरे आता गेल्या दोन तीन वर्षांपासून विकली जाऊ लागली आहेत. माझ्या अथक प्रयत्नातून श्रद्धानंद रोड नाल्याचे महत्वाचे काम पूर्ण झाल्यामुळे श्रद्धानंद रोड, आझाद रोड, मिलन सबवे परीसरात पावसाळी पाण्याचा योग्य प्रकारे निचरा झाल्याने अजिबात पाणी साठले नाही. गेले दोन पावसाळे मी भरपूर पाऊस झाल्यावर तेथील परिसरात फिरून परिस्थितीची पहाणी करून परिस्थितीचा अंदाज घेतला. श्रद्धानंद नाल्याच्या निर्मितीमुळे या ठिकाणी अजिबात पाणी साठले नाही.
याच पार्श्वभूमीवर या परिसरात पाणी साठण्याच्या समस्येपासून कायमची सुटका झाल्यामुळे येथील नागरिकांनी नुकताच आपला व स्थानिक नगरसेविका अँड. ज्योती अळवणी यांचा जाहीर सत्कार श्रद्धानंद रोड येथे आयोजित केला होता. श्रद्धानंद रोड, मिलन सबवे परिसरातील नागरिकांनी केलेल्या या सत्कारामुळे माझ्या कष्टाचे चीज झाल्याची भावना मनामध्ये आहे असे आमदार अळवणी यांनी अभिमानाने सांगितले. त्यामुळे जर इच्छाशक्ति असेल तर मिलन सब वे सारखे मुंबईतील हिंदमाता आणि इतर ठिकाणी पाणी तुंबणारे प्रश्न सुटू शकतात. त्यासाठी पालिका प्रशासनाने टास्क फोर्स स्थापन करून मुंबईतील पाणी तुंबण्याची ठिकाण दरवर्षी पावसाळ्यात तुंबण्यापासून कशी मुक्त होतील यासाठी पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी गांभिर्याने कृती करून आणि टास्क फोर्सच्या माध्यमातून मुंबईकरांना दिलासा द्यावा अशी ठाम भूमिका आमदार अँड. अळवणी यांनी शेवटी मांडली.