मुंबई - सध्या झटपट पत्रकारितेचे युग सुरू आहे. सर्वांत प्रथम बातमी देण्याच्या नादात केवळ उपलब्ध माहितीच्या आधारावर झटपट पद्धतीने मजकूर लिहिणे ही पत्रकारिता नव्हे. सखोल अभ्यास करून, मेहनत घेऊन, विषयाचा पाया पक्का करून मगच लेखन केले गेले पाहिज़े हीच पत्रकाराकडून अपेक्षा असते. हे सर्व मागे पडले आहे़ सध्या पत्रकारितेला अनावश्यक ग्लॅमर निर्माण झाले आहे. आपण काही महान कार्य करीत आहोत, असा कोणताही भाव न बाळगता, पत्रकाराने प्रामाणिकपणे आणि निष्ठापूर्वक पत्रकारिता करणेच अपेक्षित आहे, असे प्रतिपादन डॉ. मनीषा टिकेकर यांनी केले.ज्येष्ठ पत्रकार-साहित्यिक संजीवनी खेर यांना कै. वसंत शं. उपाध्ये सर्जनशील पत्रकारिता पुरस्कार प्रमुख पाहुण्या प्राध्यापिका डॉ. मनीषा टिकेकर यांच्या हस्ते नुकताच चेंबूर येथील चेंबूर हायस्कूलच्या सभागृहात प्रदान करण्यात आला. या वेळी त्या बोलत होत्या. मंचावर चेंबूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अविनाश तांबे, ज्येष्ठ पत्रकार नीला उपाध्ये आणि बाल विकास संघाचे अमित आपटे उपस्थित होते.मनीषा टिकेकर म्हणाल्या, सध्या वृत्तपत्रांची भाषा ही एक मोठी समस्या झाली आहे. वृत्तपत्रांची भाषा सभ्य असावी. कितीही मोठी वा महत्त्वाची बातमी असली तरी स्फोटक भाषेचा मोह पत्रकाराने टाळला पाहिजे. अन्य भाषेतून मराठीत मजकूर आणताना शब्दश: भाषांतर न करता आशयाच्या अधिक जवळ जाणारा मजकूर लिहिला पाहिजे. मूळ भाषेतील शब्द जसेच्या तसे लिहायचे असतील तर त्याचा नेमका उच्चार कसा आहे हेही नीट तपासणे आवश्यक आहे. संपादकीय, वृत्त, ललित अशा प्रकारांपैकी आपला लेखनप्रकार लक्षात घेऊन भाषा वापरली पाहिजे. तरच ते लेखन अधिक वाचनीय होऊ शकते.पत्रकरिता हा आनंद देणारा व्यवसाय आहे. सगळे जग आपापल्या घरांत सुट्ट्यांचा आनंद घेत असताना पत्रकार मात्र आपल्या कामात गर्क असतो. जे जे आपल्याला माहिती आहे ते ते लोकांपर्यंत पोहोचावे ही आस प्रत्येक पत्रकाराच्या मनात असते. त्याच पद्धतीने वेगवेगळ्या माध्यमांतून मी माझे म्हणणे मांडत गेले आणि त्या साऱ्याचे आज या पुरस्कारामुळे चीज झाल्यासारखे वाटत आहे.- संजीवनी खेर
पत्रकारितेला अनावश्यक ग्लॅमर निर्माण झाले आहे - मनीषा टिकेकर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2019 3:35 AM