केवळ नवीन केंद्रे तयार करणे म्हणजे आरोग्य सुविधांचे बळकटीकरण नव्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:06 AM2021-05-27T04:06:27+5:302021-05-27T04:06:27+5:30
मुंबई : कोरोना संसर्गाच्या दुसर्या लाटेपासून भारत हळूहळू सुधारत आहे. परंतु, भविष्यातील संसर्गासाठी तयार होण्याकडे अधिकाऱ्यांचे ...
मुंबई : कोरोना संसर्गाच्या दुसर्या लाटेपासून भारत हळूहळू सुधारत आहे. परंतु, भविष्यातील संसर्गासाठी तयार होण्याकडे अधिकाऱ्यांचे लक्ष असणे महत्त्वाचे आहे. कारण, कोरोना विषाणू परिवर्तनासाठी ओळखला जातो. आरोग्य सेवा मूलभूत सुविधांचे बळकटीकरण प्राधान्य यादीच्या शीर्षस्थानी असले पाहिजे. बळकटीकरण म्हणजे केवळ नवीन केंद्रे तयार करणे नव्हे, तर बायोमेडिकल उपकरणे, प्रशिक्षित कर्मचारी आणि वैद्यकीय सुविधांच्या संसाधनांमधील तफावत दूर करणेदेखील होय, असे मत परळ येथील ग्लोबल हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विवेक तलौलीकर यांनी व्यक्त केले आहे.
डॉ. तलौलीकर म्हणाले की, पहिल्या लाटेदरम्यान आलेली मंदी आणि त्यानंतर व्हॅक्सिन रोल आउट रणनीतीमुळे भारतीयांमध्ये विजयाची भावना निर्माण झाली होती आणि त्यामुळे आपण थोडे हलगर्जी झालो. हे भारतीयांसाठी संक्रमणाच्या दुसऱ्या विनाशकारी लाटेच्या मुख्य कारणांपैकी एक म्हणून लक्षात घेतले जाऊ शकते. अधिकाऱ्यांनी स्वीकारलेल्या टीका धोरणाबद्दल अजूनही अनिश्चितता दिसून येत असल्याबरोबरच लसीच्या पुरवठ्यातील तुटवड्यामुळे यामध्ये आणखी भर पडली.
कोरोनाबाबत कोणताही हलगर्जीपणा होऊ नये म्हणून सरकारने आपल्या लोकांमध्ये भविष्यात होणाऱ्या संसर्गासाठी तयारीबद्दल जागरूकता पसरवली पाहिजे. दुसऱ्या लाटेचा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. त्यामुळे भारतात ग्रामीण भागातील वाढत्या संसर्गाचा सामना करण्यासाठी एसओपी आणि टास्क फोर्स कार्यरत असणे महत्त्वाचे आहे. भविष्यात होणार्या संक्रमणाच्या कोणत्याही लाटेला सामोरे जाण्याचा सर्वांत चांगला आणि सर्वांत प्रभावी मार्ग म्हणजे जनतेचे त्वरित लसीकरण करणे आणि डब्ल्यूएचओचे नियम (मास्क, सॅनिटायझिंग आणि सोशल डिस्टन्सिंग) यांचे पालन करणे आहे, असेही ते म्हणाले.