- लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विद्यापीठात होणाऱ्या निवडणुकांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी, निवडणुकीचे ‘निवडणूक दालन’ विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर तयार करण्यात येणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने काढलेल्या जीआरमध्ये हे नमूद करण्यात आले आहे. विद्यापीठात घेतल्या जाणाऱ्या निवडणुकांचे नियम नमूद केलेले आहेत. निवडणुकांविषयीची माहिती सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी आता संकेतस्थळाचा वापर केला जाणार आहे. निवडणुकांमध्ये पोर्टलच्या माध्यमातून हायटेक पद्धतीचा वापर केला जाणार आहे. विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर ‘निवडणूक दालन’ हे एक स्वतंत्र दालन निर्माण करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या विविध प्राधिकरण आणि आणि मंडळांच्या निवडणुका घेण्यासंदर्भातील अधिसूचना, सूचना, मतदार यादी आणि निवडणुकांसदर्भातील अन्य माहिती या पोर्टलवर उपलब्ध असणार आहे. या पोर्टलवर निवडणुकांचे दस्तऐवज एकत्रित करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यावर उमेदवार अपील करू शकत नाही. मोजणीची अंतिम फेरी झाल्यावर फेरमोजणीची मागणी विचारात घेतली जाणार नाही. जर उमेदवार अथवा उमेदवाराचा प्रतिनिधी इच्छुक असेल, तर मतमोजणीच्या विशिष्ट फेरीअखेर आक्षेप घेऊ शकतो, पण एकदा फेरीची मतमोजणी संपल्यावर, दुसऱ्या फेरीची मतमोजणी सुरू झाल्यास फेर मोजणीची मागणी करू शकत नाही, असेही यात नमूद करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या निवडणुकांसाठी कुलसचिवांकडून मतदान केंद्रांची निवड करण्यात येणार आहे, तसेच कुलसचिव आवश्यक तितक्या अधिकाऱ्यांची निवड मतदानकेंद्रावर करणार आहेत, हे स्पष्ट करण्यात आले आहे.
विद्यापीठ निवडणुकांसाठी स्वतंत्र पोर्टलची निर्मिती
By admin | Published: May 20, 2017 4:00 AM