मुंबई : ॲमेझॉन प्राइमवरील ‘मुंबई सागा’ या चित्रपटात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे खोडसाळपणे, मानहानीकारक चित्रण केल्याबद्दल चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक व निर्माते यांना कायदेशीर नोटीस पाठविण्यात आली आहे. चित्रपटातील संबंधित प्रसंग, संवाद काढून टाकावेत आणि बिनशर्त माफी मागावी, अशी नोटीस संघाचे मुंबईतील स्वयंसेवक महेश भिंगार्डे यांनी वकिलांमार्फत पाठविली आहे.
चित्रपटातील एका प्रसंगामुळे संघाची मानहानी होत असून, यामुळे संघ व स्वयंसेवकांबाबत चुकीचा संदेश समाजात जात असल्याचे भिंगार्डे यांनी आपल्या नोटिशीत म्हटले आहे. ‘मुंबई सागा’ या चित्रपटातील अभिनेत्यांच्या तोंडी असलेल्या संवादातून कोण्या भाऊच्या संघटनेचा उल्लेख केला गेला आहे. या भाऊच्या संघटनेतील सदस्य संघाच्या गणवेशात स्पष्टपणे दाखविले आहेत. तसेच हा चित्रपट सत्य घटनेतून प्रेरित असल्याचे सुरुवातीलाच सांगितले गेले आहे. या चित्रपटातील काही दृश्यांमुळे, संवादांमुळे संघ आणि स्वयंसवेकांचे चुकीचे चित्रण उभे केले जात असल्याचे भिंगार्डे यांनी सांगितले. तर, ॲड. प्रकाश साळसिंगीकर म्हणाले, चित्रपटात संघाच्या गणवेशातील स्वयंसेवकांचे फोटो दाखविले आहेत. यातून संघाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न स्पष्टपणे दिसून येतो. या चित्रपटातील संबंधित चित्रण व संवाद काढून टाकावेत. ही नोटीस मिळाल्यापासून सात दिवसांच्या आत संबंधित प्रसंग व संवाद चित्रपटातून काढून टाकले जावेत. तसेच ही बदनामी केल्याबद्दल बिनशर्त माफी मागावी व त्याला प्रसारमाध्यमातून व्यापक प्रसिद्धी द्यावी, अशी मागणी आम्ही या नोटीसद्वारे केली आहे.
‘मुंबई सागा’ या हिंदी चित्रपटात इम्रान हाश्मी व जॉन अब्राहम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. संजय गुप्ता हे या चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक असून कृष्णकुमार, अनुराधा गुप्ता, संगीता अहीर हेदेखील निर्माते आहेत. सुपर कॅसेट इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेच्या मार्फत या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. संजय गुप्ता व अन्य निर्मात्यांसह सुपर कॅसेटमधील विविध अधिकारी, व्हाईट फेदर फिल्म्सचे हनीफ अब्दुल रझाक चुनावाला अशा अनेकांना ही नोटीस बजावण्यात आली आहे.