Join us

१६ व्या मजल्यावरून उडी मारून निर्मात्याची आत्महत्या, मालवणीतील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2018 2:31 AM

मित्रांसह होळीची पार्टी करून घरी परतल्यानंतर, फिल्मसिटीतील एका पर्यवेक्षक निर्मात्याने (सुपरवायझर प्रोड्यूसर) १६व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना, शुक्रवारी सायंकाळी मालवणी येथील जनकल्याण नगरात घडली.

मुंबई : मित्रांसह होळीची पार्टी करून घरी परतल्यानंतर, फिल्मसिटीतील एका पर्यवेक्षक निर्मात्याने (सुपरवायझर प्रोड्यूसर) १६व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना, शुक्रवारी सायंकाळी मालवणी येथील जनकल्याण नगरात घडली. संजय बैरागी (वय ४२) असे त्यांचे नाव असून, आर्थिक अडचणींमुळे हे कृत्य करीत असल्याचे त्यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केले आहे.जनकल्याण नगरातील सिलिकॉन इमारतीत संजय बैरागी हे पत्नी व मुलासह राहत होते. शुक्रवारी मित्रांसह धुळवड खेळून साडेपाचच्या सुमारास ते घरी परतले. त्यानंतर, तासाभरानंतर त्यांनी फ्लॅटमधील खिडकीवर चढून खाली उडी मारली. अपार्टमेंटमधील वॉचमन व अन्य नागरिकांनी त्यांना रुग्णालयात नेले. मात्र, उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्याकडे ‘सुसाइड नोट’ मिळाली. त्यात आर्थिक अडचणीमुळे घरच्यांच्या गरजा पूर्ण करण्यात असमर्थ ठरत आहे, त्यामुळे आयुष्याचा शेवट करीत आहे, असे नमूद असल्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक दीपक फटांगरे यांनी सांगितले.- संजय बैरागी यांचे एका महिलेसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय पत्नीला होता. यातून पत्नीशी नेहमी वाद होत असे. शुक्रवारी होळी खेळून आल्यानंतर, त्यांनी त्या महिलेसोबतचे फोटो फेसबुकवर अपलोड केले. पत्नीने ते पाहिल्यानंतर त्यांच्यात जोरात वाद झाला. त्यामुळेच संतापून बैरागी यांनी आत्महत्या केली असावी, असा संशय परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

टॅग्स :मुंबई