मुंबई : क्रेडिट कार्डवरील ऑफरसाठी एका व्यावसायिकाचे क्रेडिट कार्ड रेफ्रिजरेटर खरेदीसाठी घेत त्यांना १ लाख ८२ हजारांचा गंडा घातला. याप्रकरणी त्यांच्या तक्रारीवरून देवनार पोलिसांनी शुक्रवारी अनोळखी व्यक्तीविरोधात बीएनएस कायद्याचे कलम ४२० माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६(ड) अंतर्गत गुन्हा दाखल केला.
तक्रारदार इस्माईल खान (३४) हे लाकूड खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. ते मोहम्मद आरिफ खान या व्यक्तीला दोन वर्षांपासून ओळखतात. मोहम्मदने खान यांना ८ एप्रिलला फोन करत तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे का, अशी विचारणा केली. तक्रारदाराने क्रेडिट कार्ड असल्याचे त्याला सांगितले.
क्रेडिट कार्डवर ऑफर असतात त्यामुळे तुमच्या कार्डवर रेफ्रिजरेटर खरेदी करतो आणि त्याचा ईएमआय मी भरतो, असे त्याने तक्रारदाराला सांगितले.
वसुली विभागाचा फोनतक्रारदाराने त्याला क्रेडिट कार्ड दिले. त्यानंतर आरोपीने क्रेडिट कार्डवरून आधी २८ आणि नंतर ४२ हजार रुपये स्वाईप केले. याबाबत विचारणा केली असता मला पैशांची गरज असल्याने कार्ड स्वाईप केले असे मोहम्मद म्हणाला. तसेच कार्ड परत देतो, असेही त्याने सांगितले. तक्रारदार त्याच्या दुकानावर कार्ड घेण्यास गेला असता तो त्यांना तिथे सापडला नाही. मात्र हळूहळू त्याने १ लाख ८२ हजार क्रेडिट कार्डमधून काढले. त्यानंतर तक्रारदाराने त्याच्या घरी जाऊन विचारणा केली तेव्हा तो बाहेर गेल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. दरम्यान, क्रेडिट कार्ड वसुली विभागाकडून पैसे भरण्यासाठी फोन येऊ लागले. त्यामुळे इस्माईल यांनी पोलिसांत धाव घेतली.