Join us

...म्हणूनच 'याचे' श्रेय गांधी-नेहरु अन् पटेलांसारख्या काँग्रेस नेत्यांना जाते - शिवसेना नेते संजय राऊत 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2020 8:46 AM

सत्तेस वखवखलेल्या व सत्तेच्या उदरभरणासाठी कोणतेही ‘पाप’ करणाऱ्या अनेक राजकीय संस्थांनी गांधींचा हा राजकीय अध्यात्माचा मार्ग स्वीकारला तर देशात शांतता नांदेल

मुंबई - ‘गांधींमुळे देश तुटला असे ज्यांना वाटते त्यांनी तो पुन्हा अखंड करावा. तसे करण्यापासून त्यांना कोणीच रोखलेले नाही. तिकडे पाकिस्तानात बॅ. जीना कबरीत शांतपणे विसावले आहेत. पाकिस्तानचा साफ ‘नरक’ बनला, पण त्याचा दोष कोणी बॅ. जीनांच्या माथी मारत नाहीत. पण गांधी-नेहरूंनी एक आधुनिक भारत निर्माण केला. त्यांना रोज मारले जात आहे. हेसुद्धा एक स्वातंत्र्यच आहे.

हिंदुस्थानची अवस्था पाकिस्तानसारखी झाली नाही याचे श्रेय गांधी, नेहरू व पटेलांसारख्या काँग्रेस नेत्यांकडे जाते. त्यांच्यावर ‘चिखलफेक’ करण्याचे ‘पाप’ जे करीत आहेत ते ‘पाप’ करण्याचे स्वातंत्र्यसुद्धा गांधींजींनीच मिळवून दिले. एवढे तरी लक्षात ठेवा असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपाच्या वाचाळवीर नेत्यांना लगावला आहे. 

महात्मा गांधी यांची आणखी किती वेळा हत्या करणार आहोत? हे आता आपणच ठरवायला हवे. गांधी विचारांशी जे सहमत नाहीत त्यांनाही हे मान्य करावेच लागेल की गांधीजींच्या तोडीचा नेता स्वातंत्र्य चळवळीत झाला नाही. गांधींचे स्वातंत्र्य चळवळीत योगदान मोठेच होते हे मान्य करून नथुराम गोडसे याने आधी गांधींच्या पायाला स्पर्श केला व नंतर गांधींवर गोळ्या झाडल्या. गोडसेच्या प्रेमींनी गांधींवर असभ्य टीका करताना गोडसेची सभ्यताही स्वीकारायला हवी असंही संजय राऊतांनी म्हटलं आहे. 

रोखठोकमध्ये संजय राऊत यांनी मांडलेले महत्त्वाचे मुद्दे 

  • कर्नाटकातील भाजपचे नेते अनंतकुमार हेगडे यांनी जाहीर केले की, ‘गांधीजी हे ब्रिटिशांचे एजंट होते व त्यांची स्वातंत्र्य चळवळ भाडोत्री होती.’ हे विधान अस्वस्थ करणारे आहे. 
  • मधल्या काळात महाराष्ट्रात गोडसेंची पुण्यतिथी साजरी झाली तर उत्तर प्रदेशात गांधींच्या प्रतिमेवर गोळ्या झाडून गोडसेंना श्रद्धांजली वाहण्यात आली. हिंदुस्थानात गांधी जन्मास आले त्याची मोठी किंमत ते हत्येनंतर 70 वर्षांनीही चुकवत आहेत.
  • गांधींना समजून घेणे हेगडेसारख्यांना शक्य नाही. हिंदुत्वाचा विचार सगळ्यांनाच मान्य आहे. पण तालिबानी पद्धतीचे हिंदुत्व देशाचा अफगाणिस्तान करील. गोडसेला श्रद्धांजली वाहण्यासाठी गांधींना शिव्या घालण्याची गरज नाही. 
  • गांधी प्रतिमेवर गोळ्या झाडून विकृत आनंद मिळवायची आवश्यकता नाही. गांधींमुळे पाकिस्तान झाला, देशाची फाळणी झाली असे ज्यांना वाटते त्यांनी पक्षाच्या बैठकीत मोदी व शहांना सांगायला हवे की, तोडलेला पाकिस्तान परत जिंकून घ्या. 
  • अखंड हिंदुस्थानचे स्वप्न साकार करा व त्या अखंड हिंदुस्थानचे प्रतीक म्हणून लाहोर, कराची, इस्लामाबादेत वीर सावरकरांचा पुतळा इतक्या उंचीचा उभा करा की, जगाचे डोळे दिपतील. गोडसे याने अखंड हिंदुस्थानच्या ध्यासापायी गांधींवर गोळ्या झाडल्या तो अखंड हिंदुस्थान निर्माण करा. हे करण्याचे साहस कुणात आहे काय? 
  • 1931 मध्ये महात्मा गांधी गोलमेज परिषदेसाठी इंग्लंडला गेले होते. पत्रकारांच्या एका परिषदेत स्वतंत्र भारतात कशा प्रकारची राज्यव्यवस्था व घटना आपल्याला अभिप्रेत आहे, असा प्रश्न एका पत्रकाराने गांधीजींना विचारला. त्यावर गांधीजी म्हणाले होते, ‘‘भारताला सर्व प्रकारच्या गुलामीतून आणि दैन्यावस्थेतून मुक्त करणारे आणि आवश्यकता पडल्यास पाप करण्याचेही अधिकार मिळवून देणारे संविधान निर्माण होईल असा मी आटोकाट प्रयत्न करीन. 
  • अत्यंत दरिद्री माणसालादेखील ‘हा माझा देश आहे आणि त्याचे भवितव्य ठरविण्यात माझ्या शब्दालाही किंमत आहे’ असे वाटू शकेल अशा भारताची मला रचना करायची आहे.’’ असे गांधीजी ठणकावून म्हणाले व तेही इंग्रज भूमीवर. 
  • गांधींची यथेच्छ बदनामी करणे, त्यांच्या हेतूवर शंका घेणे, चारित्र्यावर चिखलफेक करणे, त्यांचे पुतळे पाडणे, पुतळ्यांवर गोळ्या झाडणे हे पाप आहे. पण हेगडे व प्रज्ञा यांना असे पाप करण्याचे स्वातंत्र्य व अधिकार गांधींमुळे प्राप्त झाले हे लक्षात घेतले पाहिजे.
  • गांधीजींचे जीवन अन्यायाविरुद्ध झगडण्यात व्यतीत झाले. 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळेपर्यंत त्यांचा बहुतेक सर्व काळ स्वातंत्र्य चळवळीच्या उभारणीत आणि तुरुंगवासात गेला. स्वातंत्र्यानंतर पाच महिन्यांनी त्यांची हत्या झाली. गांधीजींना सत्तेचा मोह नव्हता. त्यांचे जीवन समर्पित होते. गांधींना शासक म्हणून सत्ता गाजविण्याची इच्छा नव्हती. आपल्या समर्पित जीवनाने त्यांनी जनतेला केव्हाच जिंकले होते. 
  • गांधींच्या जीवनाचे सार व कार्यपद्धतीचे वैशिष्ट्य त्यांच्या ‘अहिंसे’त आहे; परंतु खेदाची गोष्ट अशी की, हिंदी जनता खऱ्या अर्थाने अहिंसाभक्त बिलकूल बनली नाही. स्वराज्याच्या पहिल्या वर्षात लाखो लोकांची हत्या आणि वाताहत झालेली आपण निमूटपणे पाहिली व अहिंसेचे मुख्य सेवक गांधीजी यांचाही खून या देशात झाला. 
  • गांधीजींएवढी असामान्य व्यक्ती या देशात होऊन गेली, परंतु त्यांच्या गुणांचे चीज आपण पुरेसे करू शकलो नाही. गांधी या व्यक्तीत देशभक्ती आणि ईश्वरभक्ती या दोहोंचा सुंदर मिलाफ झाला होता. 
  • एक अतिशय महत्त्वाची कल्पना त्यांनी आपल्या अखेरच्या दिवसांत पुढे मांडली. त्यांचे राजकीय इच्छापत्र, Last will and Testament असे तिला म्हणता येईल. त्यात ते म्हणतात की, ‘‘राजकीय संस्था म्हणून काँग्रेस या संस्थेचे कार्य समाप्त झाले असल्यामुळे या संस्थेने राजकारणातून निवृत्त व्हावे व नैतिक, सामाजिक आणि आर्थिक कार्य करीत राहावे.’’ या घोषणेचे आध्यात्मिक व राजनैतिक महत्त्व काँग्रेस काय, कुणालाच समजले नाही. 
  • सत्तेस वखवखलेल्या व सत्तेच्या उदरभरणासाठी कोणतेही ‘पाप’ करणाऱ्या अनेक राजकीय संस्थांनी गांधींचा हा राजकीय अध्यात्माचा मार्ग स्वीकारला तर देशात शांतता नांदेल, पण आपण गांधीजींचा खून केला व मृत्यूनंतरही त्यांच्यावर गोळ्या मारण्याचा षंढपणा करीत राहिलो. 
  • ज्यांचे स्वातंत्र्यलढ्यात योगदान नव्हते ते सर्व स्वातंत्र्यलढ्यास ‘भाडोत्री’ व गांधींना इंग्रजांचे एजंट म्हणू लागले. गांधी हा अभिमान वाटण्याऐवजी काही जणांना कलंक वाटू लागला. हे धक्कादायक आहे. प्रभू श्रीराम त्यांच्यावरील अन्यायाविरुद्ध लढले. त्या रामाचे मंदिर आपण उभारीत आहोत, पण गांधींचा लढाही अन्यायाविरुद्धच होता. त्यासाठी ते लढले व मरण पावले. गांधींचे जीवनही अखेरपर्यंत ‘राममय’ होते हे आधुनिक रामभक्तांनी समजून घेतले पाहिजे.  
टॅग्स :संजय राऊतशिवसेनाकाँग्रेसमहात्मा गांधीभाजपापाकिस्तान