Join us

मुंबई महापालिकेत आणखी एक घोटाळा; किरीट सोमय्यांनी लावले उद्धव ठाकरेंवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 6:20 PM

कोविडच्या नावानं घोटाळे करणारे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचे नाव इतिहासात नोंद होईल असं सोमय्या म्हणाले.

मुंबई – ज्याप्रकारे आरबीआय नोटा छापते, त्या Negotiable Instrument Transfer असतात, म्हणजे एक नोट असेल तर ती दुसऱ्याला देऊ शकतो. अशाप्रकारे बाजारात मुंबई महापालिकेच्या क्रेडिट नोट १० टक्के डिस्काऊंटने विकल्या जात आहेत. १८६७५ कोटी कर्ज मुंबईकरांवर लादले. पाठच्या दारातून दुसऱ्या दिवशी क्रेडिट नोटचे पेमेंट सुरू झाले. या घोटाळ्याचा एक भाग मी आज तुमच्यासमोर ठेवत आहे. उद्या मी आणखी पत्रकार परिषद घेईन त्यात २० हजार कोटींचा प्रकल्पग्रस्तांचा घोटाळा समोर आणणार आहे. क्रेडिट नोट प्रकरणी महापालिका आणि महाराष्ट्र सरकारने आठवडाभरात निर्णय न घेतल्यास मला न्यायालयाचे दार ठोठावावे लागेल असा इशारा देत भाजपा नेते किरिट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप लावले आहेत.

किरीट सोमय्या म्हणाले की, कोविडच्या नावानं घोटाळे करणारे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचे नाव इतिहासात नोंद होईल. मार्च २०२२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी प्रकल्पग्रस्तांसाठी घरे म्हणून अतुल चोरडिया, जयंत शहा आणि शाहीद बालवा यांना ३५ हजार घरांचे कंत्राट देण्याचा निर्णय घेतला, ४ वर्क ऑर्डरही निघाल्या आणि यासाठी लागणारा पैसा क्रेडिट नोटनं देण्याचं ठरवलं. १८६७५ कोटी क्रेडिट नोट देण्याचा करार केला, १० हजार घरांचे काम सुरू झाले. ४१५ कोटींच्या क्रेडिट नोटचा पहिला हफ्ता दिला गेला. ट्रान्स्फरेबल क्रेडिट नोट हा नवीन प्रकार उद्धव ठाकरे आणि इक्बाल चहल यांनी अंमलात आणले. मी चार्टर्ड अकाऊंट, आजपर्यंत मी ट्रान्स्फरेबल क्रेडिट नोट हा शब्दच ऐकला नाही. पण उद्धव ठाकरे, इक्बाल चहल यांनी आणले असा आरोप त्यांनी केला.

त्याचसोबत माझ्याकडे सगळे कागदपत्रे पुरावे आहेत. मुलुंडसाठी क्रेडिट नोट २८२६ कोटी, भांडूप ७४२ कोटी, प्रभादेवी ४५० कोटी, जुहू प्रकल्प ७२०० कोटी, चांदिवली १५ ते ८४ कोटी, हे प्रकल्प चोरडिया, शाह यांना देण्यात आलेत. त्यात कुणी पाटील नाही. मी क्रेडिट नोट संदर्भात पुढच्या ४ दिवसांत अर्थमंत्री म्हणून अजित पवारांची भेट घेणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझी चर्चा झालीय. ईडी, इन्कम टॅक्स, महाराष्ट्र सरकार यांच्याकडे या घोटाळ्याची चौकशी करावी अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.

दरम्यान, ४ मे २०२२ रोजी मुंबई महापालिकेच्या अर्थ विभागानेही या क्रेडिट नोटवर आक्षेप घेतला होता. महापालिकेच्या क्रेडिट नोट बाजारात विकल्या जातायेत, महापालिका आयुक्तांची चौकशी झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. हे मुंबईला लुटण्याचे कटकारस्थान आहे. मुंबई महापालिकेची ५० हजार कोटींची फिक्स डिपॉझिट ही चहल आणि ठाकरेंना संपवायची होती असा आरोप सोमय्यांनी केला.

भ्रष्टाचार मान्य नाही - सोमय्या

मी जेवढे घोटाळे काढले त्या सगळ्यात गुन्हे दाखल झाले, एकही खोटा ठरला नाही. सगळ्या प्रकरणावर न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. जर आम्ही फ्रॉड असू तर आमच्यावरही गुन्हे दाखल करा, ज्या कंपन्यांबाबत मी तक्रारी केल्या होत्या, त्यांना विद्यमान सरकारनेही कंत्राट देण्याचा प्रयत्न केला तरी मी ते चालवून देणार नाही, यावर माझी स्पष्ट भूमिका आहे. भाजपाचा नेता असो वा अन्य कुठल्याही पक्षाचा नेता भ्रष्टाचार मान्य नाही, पदाचा दुरुपयोग मान्य नाही असं किरीट सोमय्यांनी स्पष्ट सांगितले.

टॅग्स :किरीट सोमय्याउद्धव ठाकरेमुंबई महानगरपालिका