Join us  

अर्थसंकल्पाच्या श्रेयाची मित्रपक्षांमध्ये पळवापळवी! मुख्यमंत्र्यांच्या नावे योजनांमुळे शिंदेसेनेला बळ

By यदू जोशी | Published: June 30, 2024 10:40 AM

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात हजारो कोटींचे सर्वसामान्यांना थेट लाभ देणारे निर्णय घेण्यात आले.

यदु जोशी

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात हजारो कोटींचे सर्वसामान्यांना थेट लाभ देणारे निर्णय घेण्यात आले. त्यातील महत्त्वाच्या योजना या मुख्यमंत्र्यांच्या नावे आहेत. आता तीन पक्षांमध्ये अर्थसंकल्पाच्या श्रेयाची पळवापळवी सुरू झाल्याचे चित्र आहे. काल अर्थसंकल्प मांडला गेला आणि एक-दोन तासातच मुंबईत अनेक ठिकाणी ‘मदतीचा हात एकनाथ’ असे पोस्टर झळकले. अर्थात बाजूला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोन उपमुख्यमंत्र्यांचेही फोटो आहेत. शिंदेसेनेकडून राज्यभर असे पोस्टर लावले जाणार आहेत. 

भाजप प्रदेश काेअर कमिटीच्या शनिवारी प्रदेश कार्यालयात झालेल्या बैठकीत अर्थसंकल्पाने जनहित कसे साधले आहे ते १० जुलैपर्यंत जनतेत जाऊन सांगण्याचे ठरविण्यात आले. या बैठकीला उपमुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय प्रभारी भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव आदी उपस्थित होते. राज्यातील ७३५ मंडळांमध्ये पदाधिकारी जाईल आणि अर्थसंकल्पाची माहिती देईल व ती जनतेत कशी न्यायची तेही सांगेल. याचप्रमाणे अजित पवार गटानेही आपले नेते अजित पवार यांनी कसे लोकाभिमुख निर्णय घेतले त्याची माहिती वेगवेगळ्या माध्यमातून देणार आहे.

पुण्यात दोन दिवस बैठक- लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर प्रदेश भाजपने आता विधानसभा निवडणुकीचा रोड मॅप तयार केला असून कोअर कमिटीच्या बैठकीत त्यावर चर्चा करण्यात आली. - प्रदेश कार्यसमितीची बैठक १३ आणि १४ जुलै रोजी पुणे येथे होणार आहे. १३ जुलै रोजी प्रदेश भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होईल. - १४ जुलै रोजी होणाऱ्या विस्तारित कार्यसमितीच्या बैठकीला ४ हजार प्रतिनिधी उपस्थित राहतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मार्गदर्शन करणार आहेत.

दानवे, मुंडे, जानकर, गोरखे... विधान परिषदेवर कोण?विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलैला निवडणूक होणार आहे. त्यासाठी संभाव्य नावांची १२ जणांची यादी उपमुख्यमंत्री फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी आधीच पक्षनेतृत्वाकडे सोपविली आहे. त्यातील पाच नावे नेतृत्वाकडून निवडली जातील. या यादीमध्ये माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, महादेव जानकर, निलय नाईक, परिणय फुके, अमित गोरखे, चित्रा वाघ, माधवी नाईक आदींची नावे असल्याची माहिती सूत्रांनी दिली. भाजपला ११ पैकी ४ तर मित्रपक्षाला एक (जानकर) जागा मिळतील.

टॅग्स :एकनाथ शिंदेशिवसेना