Join us

क्रेडिट – डेबिट कार्डधारकांच्या संख्येत लक्षणीय वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2020 6:29 PM

increase in the number of cardholders : देशातील डेबिट कार्डधाराक ८६ कोटींवर

जनधन योजनेअंतर्गत सर्वाधिक कार्ड  

मुंबई : जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत देशातील डेबिट कार्ड धारकांच्या संख्येत तब्बल १२ टक्के (१ कोटी १३ लाख) वाढ झाली असून ती संख्या ८६ कोटी ५३ लाखांवर गेली आहे. तर, याच कालावधीत क्रेडिट कार्ड धारकांच्या संख्येतही चार टक्क्यांनी (१० लाख) वाढ झाली असून आज ५ कोटी ८६ लाख कार्ड देशातील नागरीकांच्या खिशात आहेत. या तिमाहीतले जवळपास निम्मी डेबिट कार्ड जनधन योजनेअंतर्गत दिली गेल्याची माहिती हाती आली आहे.  

आरबीआयने दिलेल्या आकडेवारीचा आधार घेत वर्ल्डलाईन या संस्थेने मंगळवारी प्रसिध्द केलेल्या एका सर्वेक्षण अहवालातून ही माहिती हाती आली आहे. प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत सुरू केल्या जाणा-या बँक खातेदारांना रुपे कार्ड दिली जातात. जुलै महिन्यांत या कार्डची संख्या २९ कोटी ४४ लाख इतकी होती. ती आता ३० कोटीपेक्षा जास्त झाली आहे. डेबिट कार्डच्या संख्येत झालेल्या विक्रमी वाढीत या योजनेतील कार्डचा मोठा वाटा असल्याचे सांगितले जात आहे.

गेल्या तीन महिन्यांत डेबिट कार्डच्या माध्यमातून १३० कोटी व्यवहार झाले असून त्यांची रक्कम १ लाख १३ हजार कोटी रुपये इतकी आहे. त्यापैकी ८५ हजार ७८६ कोटींचे सुमारे ४८ कोटी ६८ लाख व्यवहार  हे पीओएस म्हणजेच पाँईट आँफ सेल पध्दतीने झाले आहेत. तर, ई काँमर्सच्या माध्यमातून झालेल्या व्यवहारांची संख्या ५५ कोटी असली तरी त्यात १ लाख २७ हजार कोटींची देवाण घेवाण झालेली आहे. त्यात एका कार्डहून दुस-या कार्डवर केल्या जाणा-या डीजीटल पेमेंटचाही समावेश आहे. पीओएसच्या माध्यमातून क्रेडिट कार्डच्या सहाय्याने झालेले व्यवहारांची संख्या १९ कोटी ७० लाख असून त्यातली देवाणघेवाण ६३ हजार कोटी रूपयांची आहे. ई काँमर्समध्ये  ती संख्या अनुक्रमे २२ कोटी ५७ लाख व्यवहार आणि ८४ हजार कोटींची उलाढाल अशी आहे.

 

टॅग्स :ऑनलाइनडिजिटलभारतमुंबईमहाराष्ट्र