मुंबई : कर्जवसुलीसाठी ठेवलेल्या दलालानेच कर्जदाराकडून आलेली रक्कम पतसंस्थेत जमा न करता स्वत:च्या खात्यात जमा केल्याचा धक्कादायक प्रकार एन.एम. जोशी मार्ग येथे उघडकीस आला आहे. यामध्ये पतसंस्थेची एकूण २३ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे.कळवा येथील रहिवासी असलेले विजय पांडुरंग शेट्ये (५८) यांची एन.एम. जोशी मार्ग परिसरात व्यापारी सहकारी पतपेढी आहे. पतपेढीच्या सभासदांना कर्ज, तसेच विविध योजनेअंतर्गत पैसे दिले जातात. कर्जवसुली तसेच विविध योजनांची माहिती देण्यासाठी त्यांनी काही दलालांचीही नेमणूक केली आहे. २०१६ पासून अमर कुमार सुभाषचंद्र गर्ग हा त्यांच्याकडे दलाल म्हणून नोकरीला लागला. सुरुवातील त्याच्या कामाच्या पद्धतीने त्याने सर्वांचा विश्वास संपादन केला.त्यामुळे त्याच्याकडे अतिमहत्त्वाच्या कामाची जबाबदारी सोपविण्यात आली. जून २०१७ मध्ये काही सभासदांची कर्जाची रक्कम अद्याप आली नसल्याची माहिती तेथील शाखा प्रबंधकांच्या निदर्शनास आली. त्यांनी संबंधित खातेदाराला नोटीस बजावली. तेव्हा त्यांच्याकडून आलेल्या उत्तरात त्यांनी सर्व रक्कम अमरकडे दिल्याचे सांगण्यात आले. मात्र, ती रक्कम पतपेढीत जमा करण्यात आली नसल्याचे समोर आले. त्यामुळे पतसंस्थेचे अध्यक्ष कैलाश शरदचंद्र शेट्ये आणि मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश गणपत सुर्वे यांनी स्वत: नालासोपारा येथे जाऊन महालक्ष्मी दैनंदिन ठेव कर्ज योजने अंतर्गत कर्ज घेतलेल्या सभासदांची भेट घेतली. त्यांचे पासबूक तपासले असता, ३० सभासदांनी अमरकडे कर्जाची पूर्ण रक्कम दिली. अमरने स्वत:च्या मालकीच्या ‘मॉ सोल्यूशन फायनान्स सर्व्हिस सेंटर’ या कंपनीच्या हेडवर कर्ज परतफेड केल्याची प्रमाणपत्रे दिल्याचीही धक्कादायक माहिती समोर आल्याने सर्वांनाच धक्का बसला.पतसंस्थेकडे असलेल्या रेकॉर्डनुसार, त्या सभासदांची कर्जफेड झाली नाहीच. ती रक्कम अमरने परस्पर स्वत:च्या खात्यात जमा केली. अशा प्रकारे त्याने एकूण २३ लाख ३ हजार ३५० रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी त्यांनी एन.एम. जोशी मार्ग पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून एन.एम. जोशी मार्ग पोलिसांनी अमरविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
पतसंस्थेला २३ लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 2:45 AM