अपघातातील ७ जणांवर अंत्यसंस्कार
By admin | Published: February 10, 2017 04:52 AM2017-02-10T04:52:54+5:302017-02-10T04:52:54+5:30
एखाद्या भयानक स्वप्नाप्रमाणे विलेपार्लेच्या शिवाजीनगरची अवस्था झाली होती. कारण हसत-खेळत गावी निघालेल्या सात तरुणांचा अपघाती मृत्यू झाल्याची बातमी स्थानिकांना बुधवारी समजली.
मुंबई : एखाद्या भयानक स्वप्नाप्रमाणे विलेपार्लेच्या शिवाजीनगरची अवस्था झाली होती. कारण हसत-खेळत गावी निघालेल्या सात तरुणांचा अपघाती मृत्यू झाल्याची बातमी स्थानिकांना बुधवारी समजली. तथापि, गुरुवारी सकाळी जेव्हा तीन रुग्णवाहिका सात तरुणांचे मृतदेह घरी घेऊन आल्या, तेव्हा ते भयाण वास्तव पाहून त्यांच्या घरच्यांनी फोडलेल्या हंबरड्याने सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकवला.
प्रशांत गुरवसह मयूर वेळणेकर, सचिन सावंत, अक्षय केरकर, निहाल कोटीयन, वैभव मनवे, केदार तोडणकर या सात तरुणांचा रत्नागिरीतील खानू मठाजवळ अपघाती मृत्यू झाला. घटना स्थळावरून रुग्णवाहिकेतून विलेपार्ले परिसरात असलेल्या त्यांच्या घरी त्यांना गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास आणण्यात आले. आधीच मुलांच्या मृत्यूची बातमी ऐकल्यावर रडून रात्र घालवलेल्या पालकांना त्यांचे शव पाहून शोक अनावर झाला होता. त्यांनी त्यांच्या तरुण मुलाला गमावलेय, आता तो पुन्हा कधीच परत येणार नाही, ता गोष्टीवर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. अखेर मन घट्ट करत स्थानिक आणि नातेवाईकांनी या सात तरुणांच्या अंत्ययात्रेची तयारी सुरू केली. सकाळी साडेसातला त्यांचे पार्थिव आणल्यानंतर, साडे दहाच्या सुमारास एका मोठ्या ट्रकमध्ये त्यांचे मृतदेह ठेऊन अंत्ययात्रा निघाली. विलेपार्लेच्या मुक्तिधाम स्मशानभूमीत सुरुवातीला चौघांना आणि नंतर उर्वरित तिघांना अखेरचा निरोप देण्यात आला. या अंत्ययात्रेत हजारो लोक सहभागी झाले होते.
जवळपास साडेचार वाजेपर्यंत हे अंत्यसंस्काराचे विधी सुरू होते. ‘आपला मुलगा आता उठेल आणि आपल्याला मिठी मारेल,’ अशी आशा या प्रत्येक पालकाला वाटत होती. मात्र, आपला मुलगा आपल्याला कायमचा सोडून गेलाय, हे सत्य पचविण्याव्यतिरिक्त त्यांच्याकडे पर्याय नव्हता. (प्रतिनिधी)