रेवदंडा : बुधवारी (दि. २४) पहाटे भरतीच्या वेळी रेवदंडा किनाऱ्यावर सुमारे ४२ फूट लांबीचा देवमासा जखमी अवस्थेत वाहत आला आणि सर्व नागरिकांचा मोर्चा त्याला पाहण्यासाठी समुद्राकाठी जमला. या माशाचा गुरु वारी पहाटे भरतीचे पाणी ओसरल्यानंतर मृत्यू झाला आणि जिल्हा प्रशासनाने क्रेनच्या सहाय्याने खड्डा खोदून त्याला त्यात ठेवून जलसमाधी दिली. मात्र शनिवारी पहाटे हा देवमासा भरतीच्या पाण्याने फुगला आणि वाळूतून बाहेर पडल्याने त्याची दुर्गंधी पसरली. त्यामुळे प्रशासनाने त्याला शनिवारी दुपारी जाळून पुन्हा एकदा अंत्यसंस्कार केले.नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून प्रशासनाने दुर्गंधीतून मुक्तता करण्यासाठी या महाकाय माशाला जाळण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे वनविभागातील काही टन लाकडे व काही लीटर रॉकेल यांची व्यवस्था करून त्याला दुपारी दहन करण्यात आले. या माशाचे दहन झाल्यावर सुमारे १० ते १२ तास त्याला जळण्यासाठी लागले. हा महाकाय मासा पर्यटकांमध्ये कुतूहलाचा विषय बनला होता. ४२ फुटी देवमासा रेवदांडा सुमुद्रकिनारी वाहत आला तेव्हा शासकीय यंत्रणा तत्परतेने धावली आणि त्याला पाच-सहा फूट पाण्यात नेण्याचा प्रयत्न झाला, मात्र माशाचा जीव वाचू शकला नाही. दोन हजार किलो एवढे वजन असल्याने या माशाला हलविणे शक्य नव्हते, त्यासाठी आवश्यक यंत्रणाही उपलब्ध नव्हती. अशी यंत्रणा येथे उपलब्ध करून देण्याची मागणी निसर्गप्रेमी आणि नागरिकांकडून होत आहे. (वार्ताहर)कोकणच्या किनाऱ्यावर अशा प्रकारचे मृत, जखमी किंवा जिवंत मासे आढळून येतात. प्रशासनामार्फत जखमींवर उपचार करणारी सक्षम यंत्रणा असेल आणि स्थानिक नागरिकांमध्ये जाणकार मंडळी असतील तर जलचरांना जीवनदान देता येणे शक्य आहे.- शैलेश राईलकर, निसर्गमित्र
देवमाशावर पुन्हा अंत्यसंस्कार
By admin | Published: June 29, 2015 4:02 AM