मुंबई : दुबईहून मुंबई बंदरात आलेल्या सेव्हन सीज व्होयाजर या जहाजातील 170 भारतीय कर्मचारी नाविक घरी परतण्यासाठी सज्ज झाले आहेत.
या जहाजाने मुंबई बंदराजवळ नांगर टाकला असून या कर्मचाऱ्यांना मुंबई बंदरात अद्याप प्रवेश देण्यात आलेला नाही. या कर्मचाऱ्यांची कोविड 19 ची तपासणी जहाजावर जावून करण्यात आली. तपासणीचा अहवाल येईपर्यंत सध्या त्यांना जहाजावरच ठेवण्यात आले आहे. या तपासणीचा अहवाल आल्यानंतर त्यापैकी ज्यांचे अहवाल नकारात्मक असतील त्यांना घरी पाठवण्यात येईल तर ज्यांचे अहवाल सकारात्मक येतील त्यांच्यावर उपचार करण्यात येतील,अशी माहिती सुत्रांनी दिली.
भारतातील लाखो नाविक जगाच्या विविध भागात जहाजावर कामाला आहेत. त्यापैकी ज्या नाविकांृची सेवा समाप्त झाली होती त्यांना कोरोनाच्या नियमांमुळे देशात परतणे अशक्य झाले होते. मात्र केंद्रीय गृह मंत्रालयाच्या निर्देशानंतर या नाविकांना त्यांची सेवा समाप्त झाल्यावर घरी परतणे शक्य झाले आहे. नँशनल सीफेअर्स ऑफ इंडिया चे अब्दुल गनी सेरंग व मिलींद कांदळगावकर यांनी नाविकांना अतिशय लाभदायक ठरलेल्या या निर्देशांचे स्वागत केले व अशा प्रकारे विविध देशातील जहाजांवर सेवा संपल्यानंतरही अडकलेल्या नाविकांना घरी परतणे शक्य होत असल्याने समाधान व्यक्त केले. देशातील क्रुझ शिपिंगचे समन्वयक व मुंबई पोर्ट ट्रस्टचचे वरिष्ठ अधिकारी गौतम डे म्हणाले, या जहाजातील 170 भारतीय कर्मचाऱ्यांची कोविड 19 ची तपासणी झाली असून त्यांच्या अहवालाची प्रतिक्षा आहे. अहवाल तपासल्यानंतर त्यांच्याबाबतचा निर्णय घेतला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.